

कोल्हापूर, आशिष शिंदे : जलप्रदूषणामुळे मृत माशांचा खच नदीपात्रात दिसणे, हे नेहमीचेच झाले आहे. प्रदूषणामुळे माशांच्या प्रजननावर होणार्या परिणामांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे.
नदी आणि समुद्राच्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत होतात. प्रदूषणाचा माशांच्या प्रजननावर परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी सरकारकडे आल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
जलप्रदूषणाची तसेच पर्यावरणाच्या तक्रारींची शहानिशा करणे, नदी तसेच समुद्रामध्ये कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे पाण्याची गुणवत्ता खराब होते. त्याच्या नेमक्या परिणामांची तपासणी करणे, या प्रदूषणामुळे माशांचा मृत्यू होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे. त्याचबरोबर प्रदूषण आणि यामुळे जर माशांच्या प्रजननावर परिणाम होत असेल, तर जलप्रदूषण करणार्या कंपन्यांवर अथवा संबंधितांवर कारवाई करणे, अशी समितीची कार्यकक्षा आहे. या समितीची बैठक दर महिन्याला होणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक व जलप्रदूषण नियंत्रक या समितीचे अध्यक्ष असतील. कोल्हापूर, रायगड आणि ठाणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, सागरी मत्स्य व्यवसायसह आयुक्त मुंबई, सागरी जिल्ह्यांतील सर्व मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त हे समितीचे सदस्य असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तांत्रिक विभागाचे मुंबईचे प्रादेशिक अधिकारी समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.