कोल्हापूर : मानसिक आजाराचे प्रमाण 4 टक्क्यांवर

कोल्हापूर : मानसिक आजाराचे प्रमाण 4 टक्क्यांवर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अतिउत्साहात काहीजण मोबाईल बंद असतानाही मोबाईलवर मोठ्याने बोलतात, काही जण उगाचच विनाकारण वारेमाप पैसे उधळतात, हे मानसिक आजाराचेच लक्षण समजले जाते. वैद्यकीय भाषेत याला 'बायपोलर मूड डिसॉर्डर' म्हटले जाते. धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यात 100 पैकी 4 जणांना मानसिक आजाराची समस्या असल्याची माहिती मानसोपचारतज्ज्ञांनी दिली.

वेळेत निदान, उपचार झाले तर या आजारातून रुग्ण पूर्णतः बरा होत असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोना संसर्गामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे मानसिक आजाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढली झाली आहे. त्यातही चिंता रोगाच्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. सध्या आर्थिक चणचण, धकाधकीचे जीवन, विभक्त कुटुंब पद्धती, नातेसंबंधातील दुरावा यामुळे दिवसेंदिवस मानसिक समस्यांची गुंतागुंत वाढली आहे. या आजारावर वेळीच नियंत्रण मिळविता आले नाही, तर नकारात्मकता वाढीस लागते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतात दर पाच महिलांपैकी एक महिला दर 12 पुरुषांपैकी एक पुरुष मानसिक आजाराच्या जाळ्यात सापडला आहे. मानसिक आजाराच्या बाबतीत महिलांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे सप्षट दिसून येत आहे. तसेच मानसोपचारतज्ज्ञांच्या मते बरेच रुग्ण आत्महत्या करतात तेव्हा ते मानसिक आजारानेच त्रस्त असतात. यामध्ये उदासीनता, डिप्रेशन, व्यसनाधीनता आणि व्यक्तिमत्त्व विकृती यामध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी 8 लाख नागरिक आत्महत्या करून आपले जीवन संपवितात.

50 टक्के युवा पिढी त्रस्त

बहुतांश तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. सुमारे 50 टक्के युवा पिढीला मानसिक आजार सतावत आहेत. ते सहज मानसिक तणावाखाली जातात. त्यातून त्यांना मानसिक विकार होण्याचे प्रमाण वाढत असल्याचेही मानसोपचारतज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news