कोल्हापूर : मागणी 500 पासून 45 लाखांची; दीड वर्षात धरपकड 54 जणांची

कोल्हापूर : मागणी 500 पासून 45 लाखांची; दीड वर्षात धरपकड 54 जणांची
Published on
Updated on

कोल्हापूर : गौरव डोंगरे
लॉकडाऊननंतर लाचखोरांचेही मीटर वाढू लागले आहे. पाचशे-हजारांची चिरीमिरी मागणार्‍यांपासून थेट 45 लाखांच्या मागणीपर्यंत मजल पोहोचली. जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत झालेल्या 36 कारवायांमध्ये 37 सरकारी नोकर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले, तर 15 खासगी व्यक्तीही अडकल्या आहेत. नगररचनाकाराने सर्वाधिक रकमेची 45 लाखांची मागणी करून 20 लाख घेतल्याची घटना 6 फेब्रुवारी 2021 मध्ये घडली. तर महावितरणकडील दोन कंत्राटी कामगार 500 रुपयांची लाच घेताना सापडल्याची कमीत कमी रकमेची कारवाई म्हणता येईल.

सेवानिवृत्तीनंतर पेन्शनची कागदपत्रे पूर्ण करायची असो किंवा नवीन लाईटचे मीटर घ्यायचे असो तुमच्याकडून काहीतरी घेतल्याशिवाय तुमचे कामच होत नाही. सात-बारावरील नोंदी, गुन्ह्याच्या कामात मदत, महापूर येऊन गेल्याचा दाखला बनविणे, आरोग्य तपासणीचा दाखला देण्याचे काम असू दे तुमचे काम सहजा सहजी होऊच नये यासाठीच काहीशी फिल्डिंग लावली जाते. त्यात तुमचे काम लवकर करायचे असेल तर हवी ती रक्कम मोजावी लागते. जमिनीच्या कामासाठी 45 लाखांची मागणी, सात-बारावर नावे लावण्यासाठी तिघा खासगी व्यक्तींकडून 12 लाखांची मागणी, प्रांताधिकारी व सरपंचांची 11 लाख लाचेच्या मागणीसाठी अटक, स्क्रॅप व्यावसायिकाला धमकावून दोघा पोलिसांकडून 25 लाखांच्या लाचेची मागणी, ग्रामविकास अधिकार्‍याकडून 14 लाखांच्या लाचेची मागणी या रकमा पाहून सर्वसामान्यांचे डोळेच पांढरे होण्याची वेळ आली आहे. महसूल विभागात 11, पोलिस खात्यात 10, ग्रामविकास, आरोग्य विभाग प्रत्येकी 3, महावितरण 5, नगरविकास 2 अशा कारवायांची मागील दीड वर्षात आकडेवारी आहे. खासगी पंटरांचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला असून दीड वर्षात 15 जणांविरोधात कारवाई झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news