कोल्हापूर : महापालिकेचा डांबरी प्लांट बंद

कोल्हापूर : महापालिकेचा डांबरी प्लांट बंद

कोल्हापूर, डॅनियल काळे : महापालिकेच्या मालकीचा डांबरी प्लांट बंद असल्यानेच शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कसबा बावडा येथे असणारा हा डांबरी प्लांट कचर्‍याच्या ढिगार्‍याखाली गाडला गेला आहे. 60 लाख रुपये खर्च केले तर हा प्लांट दुरुस्त होतो, पण विशिष्ट ठेकेदारांचे उखळ पांढरे करण्यासाठी हा प्लांट बंद पाडल्याची चर्चा आहे. हा प्लांट सुरू केला तर महापालिकेचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. रस्त्याचे आणि पॅचवर्कचे कामही दर्जेदार होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. महापालिका प्रशासनाची कमालीची उदासीनता आणि ठेकेदारांचा दबाव यामुळेच हा प्लांट बंद पाडला असल्याचे आता बोलले जात आहे.

पावसाळी पाण्याचा निचरा होत नाही

शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. खड्ड्यांमुळे शहरवासीयांचे कंबरडे मोडत आहे. हे खड्डे बुजविताना मात्र प्रशासनाची दमछाक होत आहे. सततच्या पावसाने रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यातच आयआरबीने रस्ते करताना पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी केलेली व्यवस्था कुचकामी ठरली आहे. नगरोत्थान योजनेतून रस्ते करतानाही पावसाळी पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था नीट केली नाही. परिणामी शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवरून पाणी वाहते. पाणी हाच डांबरी रस्त्याचा प्रमुख शत्रू आहे.त्यामुळे रस्ते खराबही होत आहेत आणि रस्त्यावर खड्डेच खड्डे सर्वत्र पडत आहेत. हा प्रश्न सध्या गंभीर व?ळणावर आहे.

महापालिकेचा डांबरी प्लांट कशासाठी?

कमी खर्चात, वेळेत जास्त लांबीचे दर्जेदार रस्ते व्हावेत, यासाठी महापालिकेचा अनेक वर्षांपासून स्वमालकीचा डांबरी प्लांट आहे. या डांबरी प्लांटला चांगले दर्जेदार डांबर वापरले जात होते. जे डांबर ठेकेदार कंपन्या वापरतात.त्यापेक्षा महापालिका चांगल्या दर्जाचे डांबर वापरत होती. त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत तर होतच होती, पण रस्तेही दर्जेदार केले जात होते.

पवडी आणि डांबरी बॅच स्वतंत्र

दर्जेदार रस्ते आणि खड्डा पडला की तातडीने चांगले पॅचर्वक करण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक विभागीय कार्यालयाकडे स्वतंत्र बॅच होती.एका टीममध्ये 20 कर्मचारी असायचे. त्यासाठी स्वतंत्र वाहनेही होती. डांबरी प्लांट बंद केल्याने आता या बॅचमधील कर्मचारी साहेबांच्या केबिनला, कार्यालयात क्लार्क म्हणून काम करत आहेत. मूळ हुद्दा सोडून इतरत्र हे कर्मचारी काम करत आहेत.

टक्केवारीनेच शहराचे वाटोळे

महापालिकेत टक्केवारीची रीतच पडली आहे. त्यामुळे जे जे चांगले, शहराच्या हिताचे ते बंद पाडण्याचे काम केले गेले.शहरातील महापालिकेच्या स्वमालकीचा डांबरी प्रकल्प हा देखील त्याचाच एक भाग आहे. रस्ते असूदे, अथवा पॅचवर्कचे काम असूदे, निविदा काढणे, टक्केवारी ठरविणे आणि मर्जीतल्या ठेकेदारांनाच काम देण्याच्या वृत्तीमुळे महापालिकेतला पवडी विभाग टक्केवारीचा अड्डा बनला आहे. त्यामुळेच तर डांबरी प्लांटसारखा एक फायदेशीर आणि शहरवासीयांना चांगली सुविधा देणारा प्लांट बंद पाडला गेला आहे. गेल्या पाच वर्षांत 25 कोटींचे रस्ते आणि 21 कोटींचे पॅचवर्क करूनही लोकांचा प्रवास खड्ड्यातूनच आहे. महापालिकेचा डांबरी प्लांट असता तर यापेक्षा दुप्पट लांबीचे रस्ते आणि चांगल्या दर्जाचे पॅचवर्कही करता आले असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news