कोल्हापूर मनपा चषक खंडोबा तालीमकडे

कोल्हापूर मनपा चषक खंडोबा तालीमकडे
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : हजारो फुटबॉल शौकिनांच्या उत्साही उपस्थितीत चुरशीने झालेल्या खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील अंतिम सामना संपूर्णवेळ गोलशून्य बरोबरीत राहिला. निकालासाठीच्या टायब्रेकरमध्ये खंडोबाने बालगोपालचा 4-3 असा पराभव करून कोल्हापूर महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

छत्रपती शाहू स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम सामन्याचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत आडसूळ, सचिन चव्हाण, पंडित पोवार आदी उपस्थित होते.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद खेळ झाला. आघाडीसाठी योजनाबद्ध खोलवर चढाया करण्यात आल्या. मात्र, भक्कम बचावामुळे कोणालाही आघाडी मिळवता न आल्याने मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य होता. उत्तरार्धात खेळाचा वेग वाढला. दोन्हीकडून आघाडीसाठी लागोपाठ चढाया सुरू होत्या. खंडोबाच्या कुणाल दळवी, दिग्विजय आसणेकर, मायकेल सेफ, प्रभू पोवार यांनी केलेल्या चढाया अपयशी ठरल्या. तर बालगोपालकडून प्रतीक पोवार, दिग्विजय वाडेकर, प्रसाद सरनाईक, व्हीक्टर, ऋतुराज पाटील यांच्या चढाया फोल ठरल्या. फिनिशिंग अभावी अखेरपर्यंत कोणाकडूनही गोलची नोंद होवू शकली नाही. सामन्यात गोलरक्षक निखिल खन्ना (खंडोबा) व परमजीत बाघेल (बालगोपाल) यांनी उत्कृष्ट गोलरक्षण केले. अखेर सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला.

टायब्रेकरमध्ये 'खंडोबा' चा जय

टायब्रेकरमध्ये बालगोपालकडून प्रतिक पोवार, प्रसाद सरनाईक, ऋतूराज पाटील यांनी गोल केले. तर दिग्विजय वाडेकरचा स्ट्रोक गोलपोस्टच्या बाहेर गेला. व्हीक्टरचा स्ट्रोक गोलपोस्टला लागून बाहेर गेला. उत्तरादाखल खंडोबाच्या मायकेल सेफ, प्रथमेश गावडे, प्रभू पोवार, ऋतुराज संकपाळ यांचे स्ट्रोक बिनचूक गोलमध्ये रुपांतरीत झाले. यामुळे सामना खंडोबाने 4-3 असा जिंकला.

रणहलगी अन् आतषबाजीत बक्षीस समारंभ

स्पर्धेची सांगता बक्षीस समारंभाने झाली. साऊंड सिस्टीमसह रणहलगीच्या साथीत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत खेळाडू व संघांचा गौरव माजी खा. संभाजीराजे, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गोकुळचे संचालक अरुण नरके, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अमित कामत, माजी नगरसेवक ईश्वर परमार, विनायक फाळके, सचिन पाटील, आदिल फरास, रविकिरण इंगवले, विजय खाडे-पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news