

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :सरकार पाडण्याबाबत वारंवार वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुका कोणालाच परवडणार्या नाहीत, असे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 160 ते 170 जागा निश्िचत मिळतील. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपला पुन्हा सत्तेवर येऊ देणार नाही या शरद पवार यांच्या वक्तव्यावर आ. पाटील यांनी गरजेल तो पडेल काय? महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणणार ते उत्तरच्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल. पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात चर्चा केली होती; परंतु आपण त्यांना नकार दिला आहे.
जयश्री जाधव यांना आम्ही भाजपकडून उमेदवारी देतो ही निवडणूक बिनविरेाध करूया, असा पर्याय त्यांना दिला होता. विधान परिषदेची गोष्ट वेगळी आहे. तीन जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपने विधान परिषदेला कोल्हापूरची जागा सोडली. या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे.
महाविकास आघाडीचे सरकार विश्वासघाताने आलेले सरकार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची वाटचाल सुरू होती; परंतु अडीच वर्षांपूर्वीच शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. त्यामुळे ते तिघे एकत्र लढले तरी ही मते भाजपलाच मिळतील.