कोल्हापूर : मंगलमूर्तीचे जल्‍लोषात स्वागत

कोल्हापूर : मंगलमूर्तीचे जल्‍लोषात स्वागत
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : 'मोरया…'चा अखंड जयघोष, फडकणारे भगवे ध्वज, पताका, पारंपरिक वाद्यांचा दणदणाट आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी आबालवृद्धांचा जल्‍लोष, अशा उत्साही वातावरणात बुधवारी लाडक्या मंगलमूर्तीचे सर्वत्र आगमन झाले. तीन वर्षांनी निघालेल्या गणेश आगमनाच्या उत्साही मिरवणुकांनी अवघा जिल्हा मंगलमय झाला होता. आसमंत उजळणार्‍या लेसर शोच्या लखलखाटात शहर उजळून निघाले.

काही काळ ढगाळ वातावरण, दुपारी चटके बसणारे ऊन आणि रात्री पावसाच्या सरी, अशा वातावरणात लाडक्या गणरायाचे स्वागत अपूर्व उत्साहात करण्यात आले.  सकाळपासून घरगुती गणपतींचे आगमन आणि प्रतिष्ठापना झाल्यानंतर कार्यकर्ते दुपारी सार्वजनिक तालीम संस्था-तरुण मंडळांच्या मिरवणुकांसाठी बाहेर पडले. मंडळांच्या दारात ट्रॅक्टर-ट्रॉल्या, ट्रक आणि बाप्पांसाठी रथ सजविण्यात आले. रोषणाईने झगमगणारे बाप्पांचे रथ त्यापुढे लेसर शो, ढोल-ताशा पथकांचा दणदणाट, त्याच्या जोडीने ढोली बाजा, तर अनेक मंडळांनी मिरवणुकीतील पारंपरिकता जपत भजनी मंडळांबरोबरच सुरेल सुरावटीच्या ब्रासब्रँडच्या निनादात काढलेल्या मिरवणुका पाहण्यासाठी रस्ते फुलले होते. पावसाच्या सरी झुगारत आबालवृद्ध मिरवणुकांत उत्साहाने सहभागी झाले होत; तर मिरवणूक मार्गावर मोठी गर्दी होती. गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणरायाच्या प्रतिष्ठापनेने चैतन्यदायी उत्साहपर्वाची सुरुवात झाली. महापूर व लॉकडाऊनमुळे तीन वर्षे गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व प्रतीकात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला होता. यंदाच्या गणेशोत्सवाची तमाम भक्‍तांना उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राज्य सरकारने निर्बंधमुक्‍त गणेशोत्सव जाहीर केला. त्यानुसार यंदाचा 10 दिवसांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन केले आहे. त्याची झलक गणेश आगमन मिरवणुकांतून पाहायला मिळाली.

शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, रविवार पेठ, उत्तरेश्‍वर पेठ, सोमवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठेसह राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, सानेगुरुजी, जरगनगर, आर.के.नगर, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, कदमवाडी, जाधववाडी, भोसलेवाडी, फुलेवाडी, पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, लक्षतीर्थ, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, टेंबलाईवाडी, गांधीनगर परिसरातील बहुतांशी तालीम संस्था व तरुण मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन झाले. अनेक मंडळांनी साऊंड व लेसर सिस्टीमच्या तालात छोट्या-मोठ्या मिरवणुका काढल्या.
दरम्यान, गंगावेस, पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्‍ली, बापट कॅम्प, मार्केट यार्डातील कुंभार व्यावसायिकांच्या कार्यशाळांसह ठिकठिकाणी उभारलेल्या गणेशमूर्ती स्टॉल्सवर दिवसभर लोकांची गर्दी होती. दुपारपर्यंत घरगुती गणेशमूर्ती नेण्यात आल्या. दुपारनंतर सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. हातातून, डोक्यावरून, दुचाकी, चारचाकी, रिक्षा, हातगाडी, रथ- बग्गी, ट्रॅक्टर, टेम्पो अशा विविध वाहनांमधून गणेशमूर्ती नेण्यात आल्या.

कुंभार गल्ल्यांसह प्रमुख मार्ग व चौकाचौकांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था-संघटनांच्या वतीने गणेश मंडळांचे जंगी स्वागतही ठिकठिकाणी करण्यात आले. जिल्ह्यातील 7 हजार 800 सार्वजनिक मंडळांपैकी बहुतांशी मंडळांच्या गणेशांची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी झाली; तर सुमारे साडेतीन लाख घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news