कोल्हापूर : भरदिवसा पाच लाखांचे दागिने लंपास; महिला जेरबंद

कोल्हापूर : भरदिवसा पाच लाखांचे दागिने लंपास; महिला जेरबंद

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : ताराराणी चौक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन कुर्ली (ता. निपाणी) येथील प्रवासी महिलेचे पाच लाखांचे दागिने लंपास केल्याप्रकरणी सांगलीतील सविता ऊर्फ पप्पी केरू चौगुले (वय 28, रा. गारपीर चौक, इंदिरानगर, झोपडपट्टी) हिला शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले.

या महिलेकडून चोरीचे अनेक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तिच्याकडून पाच लाखांचे 10 तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत. भरचौकातील या चोरीचा छडा शाहूपुरी पोलिसांनी 24 तासात लावला.

अंजना लक्ष्मण साळवी या पतीसमवेत चिपळूणला गेल्या होत्या. शनिवारी (दि. 11) सकाळी हे दाम्पत्य कोल्हापूर- गडहिंग्लज एसटीने निपाणीकडे जात असताना ताराराणी चौकात एसटी बंद पडली. त्यामुळे ते एसटीतून खाली उतरले.

थोड्या वेळानंतर निपाणीकडे जाणारी एसटी आली. यामध्ये बसताना गर्दीचा फायदा घेऊन संशयित महिलेने साळवी यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची पर्स लंपास केली.

सीसीटीव्ही फुटेज व अन्य माहितगाराकडून संशयित महिलेचा पोलिसांनी छडा लावला. सहायक निरीक्षक श्रीकांत इंगवले, श्वेता पाटील, शुभम संकपाळसह पथकाने सांगलीतील इंदिरानगर झोपडपट्टीत या महिलेचा शोध घेतला तेव्हा ती दहा दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजले.

चौकशीनंतर हातकणंगले परिसरातून तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून सोन्याचा हार, चार बिल्वर, कानातील वेल, दोन अंगठ्या असे 10 तोळ्याचे दागिने जप्त करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news