कोल्हापूर बनतेय ‘टूरिस्ट डेस्टिनेशन’

कोल्हापूर बनतेय ‘टूरिस्ट डेस्टिनेशन’
Published on
Updated on

कोल्हापूर : अनिल देशमुख

धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिक पर्यटनासाठी समृद्ध विपुल साधनसामग्री असलेले कोल्हापूर राज्यातील प्रमुख 'टूरिस्ट डेस्टिनेशन' बनत आहे. मे महिन्यात 25 लाखांहून अधिक पर्यटक, भाविकांनी कोल्हापूरला भेट दिली आहे. यातून सुमारे 100 कोटींची उलाढाल झाली आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांचीच मे महिन्यातील संख्या 18 लाख 98 हजारांवर गेल्याची आकडेवारी आहे.

करवीर निवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, बाळूमामा मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राधानगरी, दाजीपूर अभयारण्य, पन्हाळा, विशाळगडासह जिल्ह्यातील विविध गडकोट, पावनखिंड आदी नैसर्गिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळे, कणेरीमठ, रंकाळा, न्यू पॅलेस म्युझियम, टाऊन हॉल म्युझियम आदींबरोबर तांबडा-पांढरा रस्सा, झणझणीत मिसळ आदी खाद्य संस्कृती, कोल्हापूर चप्पल, विविध कलाकुसरीचे दागिने यामुळे पर्यटक, भाविकांचा कोल्हापूरकडील ओढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दि. 1 ते दि. 31 मे या कालावधीत अंबाबाई मंदिराच्या दर्शनासाठी 18 लाख 98 हजार 373 भाविक आल्याची नोंद झाली आहे. प्रवेशद्वारावरील मेटलडिटेक्टरवर ही नोंद होते. मात्र, गर्दी असल्यास, वेगाने पुढे सरकल्यास त्याची नोंद होत नाही, याचा विचार करता ही संख्या 20-22 लाखांपुढे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासह कोल्हापुरात आलेल्या पर्यटकांचा विचार करता मे महिन्यांत 25 लाखांहून अधिक पर्यटक, भाविकांनी भेट दिल्याचे स्पष्ट आहे.

कोल्हापुरात आलेल्या पर्यटकांचा पूजेचे साहित्य, चहा-नाश्ता, जेवण, राहणे, खरेदी, पार्किंग, पेट्रोल-डिझेल, रिक्षा आदी ठळक बाबींचा खर्च विचारात घेतला आणि एका पर्यटकांमागे 300 ते 400 रुपयांचा खर्च धरला, तरी केवळ मे महिन्यात कोल्हापूर शहरात पर्यटनातून सुमारे 100 कोटींहून अधिक उलाढाल झाल्याची शक्यता आहे.

कोल्हापूर राज्यातील टूरिझम हब
सहकुटुंब यावे, दोन-तीन दिवस राहावे, देवदर्शन करावे, पर्यटन करावे, चमचमीत, झणझणीत खावे, मनसोक्त खरेदी करावी असा विचार केला, तर कोल्हापूरचेच नाव सर्वप्रथम येईल, असे सर्व काही कोल्हापुरात आहे. धार्मिक पर्यटन आहे, ऐतिहासिक पर्यटन आहे, नैसर्गिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन आहे, खाद्य संस्कृती आहे. कोल्हापूरचे भौगोलिक स्थान महत्वाचे आहे. कोकणात, गोव्याला जायचे, तर कोल्हापूर थांबून पुढे जाता येते. कर्नाटकात जायचे, तरी कोल्हापुरातून जाता येते. रस्ते, रेल्वे आणि विमानसेवेमार्गे कोल्हापूर राज्यातीलच नव्हे, तर देशातील प्रमुख शहरांशी जोडले आहे. यामुळे कोल्हापुरात राज्याचे टूरिझम हब होण्याची क्षमता आहे.

पर्यटन विकासासाठी सामूहिक, नियोजनबद्ध विकासाची गरज
देशातील केरळ, राजस्थान यासह पूर्वेकडील काही राज्यांच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा मोठा वाटा आहे. कोल्हापूरच्या अर्थकारणाला वेगाने गती देण्याची ताकद येथील समृद्ध वारशात आहे. यामुळे पर्यटन विकासासाठी सामूहिक आणि नियोजनबद्ध विकासाची गरज आहे. सध्या पर्यटन, धार्मिक स्थळांचा विकास, शहरातील प्रमुख रस्ते, पार्किंग सुविधा, दिशादर्शक फलक, नवी पर्यटन स्थळे विकसित करणे आदींसाठी प्रयत्नाची गरज आहे. जिल्हा प्रशासनाकडून पर्यटनस्थळांचे डीपीआर तयार करण्यात येत आहेत. त्याचा प्रस्ताव सादर होईल. त्याला राज्य सरकारने बळ देण्याची आवश्यकता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news