कोल्हापूर : पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना ‘राष्ट्रपती शौर्यपदक’

कोल्हापूर : पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना ‘राष्ट्रपती शौर्यपदक’
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  राजस्थान, मध्य प्रदेशात धुमाकूळ घालणार्‍या बिष्णोई टोळीचा बंदोबस्त केल्याबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस निरीक्षक तानाजी सावंत व पोलिस हवालदार नामदेव यादव या दोघांना 'राष्ट्रपती शौर्यपदक' जाहीर करण्यात आले.

राजस्थानच्या 007 बिष्णोई टोळीसोबत किणी टोल नाका येथे झालेल्या चकमकीनंतर कोल्हापूर पोलिसांनी म्होरक्यासह टोळीला पकडले. या कामगिरीत पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी 6 राऊंड फायर केले. हवालदार नामदेव यादवही त्यांच्या पथकात सहभागी होते.
28 जानेवारी 2020 रोजी बिष्णोई टोळी कर्नाटकातून कोल्हापुरात प्रवेश करणार असल्याची माहिती तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथक किणी टोल नाका येथे पाठविण्यात आले होते. नाक्यावर सापळा रचला असताना बिष्णोई टोळीचे गुंड मोटारीतून तिथे आले. पोलिसांनी त्यांना घेरल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पोलिस निरीक्षक सावंत, हवालदार यादव यांच्यासह पथकाने त्यांचा प्रतिकार केला. सावंत यांनी रिव्हॉल्व्हरमधून बिष्णोई टोळीच्या दिशेन 6 राऊंड फायर केले. त्यात बिष्णोई टोळीचा म्होरक्या शामलाल पुनिया, श्रवणकुमार बिष्णोई जखमी झाले. या दोघांसह श्रीराम मांजू याला गजाआड करण्यात पोलिस निरीक्षक सावंत आणि त्यांच्या पथकाला यश आले.

पोलिस निरीक्षक तानाजी सावंत मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी गावचे रहिवासी आहेत. पीएसआयपदापासून वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदापर्यंत स्वकर्तृत्वाने त्यांनी पदोन्नती मिळवली. नाशिक येथील प्रशिक्षणानंतर मुंबईत मालाड पोलिस ठाणे, क्राईम ब्रँच, नाशिक जिल्ह्यात पंचवटी पोलिस ठाणे, क्राईम ब्रँच, एसपीयू, एसीबी, पुणे सीआयडी आदी ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर 2016 मध्ये ते कोल्हापूर जिल्ह्यात रुजू झाले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे, एलसीबीनंतर सध्या ते स्पेशल ब्रँचमध्ये कार्यरत आहेत.

सावंत यांच्या 29 वर्षांच्या सेवेमध्ये 2010 साली उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले; तर 2012 मध्ये पोलिस महासंचालक पदक मिळाले. गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदकही मिळाले असून, आतापर्यंत 390 बक्षिसे त्यांनी मिळवली आहेत. हवालदार नामदेव यादव यांना मे 2021 मध्ये पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news