कोल्हापूर : पुन्हा मादळेत गवे; आजर्‍यात टस्कर

कोल्हापूर : पुन्हा मादळेत गवे; आजर्‍यात टस्कर

कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा : मादळे (ता. करवीर) येथील जंगल परिसरात सुमारे सहा ते सात गव्यांचा कळप दाखल झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पाहिले. गवे पाहण्यासाठी पर्यटक मादळे येथे येऊ लागले आहेत.

शनिवारी सकाळी मादळेच्या पश्‍चिमेस शेटके फार्म हाऊस शेतीभागात मुक्‍तपणे गव्याला फिरताना शेतकरी व प्रवाशांनी पाहिले. सायंकाळी सहाच्या सुमारास तर मादळेच्या मुख्य रस्त्यापासून अगदी 25 ते 30 फुटांवर गवा शांतपणे चरताना दिसला. रविवारी सायंकाळी मादळे शिवारात पिराचे पाणी येथे सुमारे सात गळ्यांचा कळप स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. यामुळे पाऊस सुरू झाल्यानंतर गवे मुख्य अधिवासात निघून जातील, हा अंदाज आता फोल ठरत आहे.

जानेवारी महिन्यापासून गव्यांचा कळप करवीर तालुक्यातील मादळे, हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी, मनपाडळे, अंबप, पाडळी, पारगाव या परिसरात वारंवार निदर्शनास येत आहे. सुरुवातीस डोंगर परिसरात दिसणारा गळ्यांचा कळप हळूहळू शेती आणि मानवी वस्तीकडे येऊ लागला.

आजरा-आंबोली मार्गावर टस्करचे दर्शन

आजरा : आजरा तालुक्यात टस्करकडून नुकसानीचे सत्र सुरूच आहे. सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास आजरा-आंबोली मार्गावर टस्करने दर्शन दिले. यामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

तालुक्यातील हाळोली जंगलात टस्कर ठाण मांडून आहे. या टस्करने हाळोली, वेळवट्टी, देवर्डे, माद्याळ, मसोली गावांतील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. दररोज हा टस्कर आजरा-आंबोली मार्ग ओलांडून जात असतो. सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील डॉ. धनाजी राणे यांच्या फॉर्म हाऊसजवळून टस्कर रस्त्यावर आला. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अचानक टस्कर रस्त्यावर आल्यामुळे वाहनधारकांची चांगली तारांबळ उडाली. टस्कर सातत्याने रस्त्यावर येत असल्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news