

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहर आणि परिसरात सोमवारी सायंकाळी सुमारे 35 ते 40 मिनिटे पावसाचे धुमशान सुरू होते. धुवाँधार पावसाने शहर तासाभरासाठी अक्षरश: तुंबले. रस्त्यावरील पाण्याने प्रमुख मार्गावरील वाहतूक विस्कळीत तर अनेक ठिकाणी ठप्प झाली. गडगडणार्या ढगांसह कानठळ्य्या बसवणार्या विजांनी शहरवासीयांना धडकी भरवली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील कंपाऊंडचा लोखंडी खांब व करवीर प्रांताधिकारी कार्यालयासमोरील एका सोसायटीच्या आवारातील नारळाचे झाड अशा दोन ठिकाणी वीज कोसळली. सुदैवाने जीवित वा वित्त हानी झाली नाही. दरम्यान, पावसाने नागरिकांच्या दिवाळी खरेदीच्या उत्साहावर पाणी फिरवले. शहरातील बहुतांशी सर्व बाजारपेठा ओस पडल्या. पावसाने अनेक ठिकाणी आकाशकंदील, रांगोळी, फराळाचे साहित्य भिजले वा वाहून गेले. यामुळे व्यापारी, विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले.
सकाळी वातावरण ढगाळ होते. हवेत आर्द्रताही वाढली होती. यामुळे पावसाच्या हलक्या सरी बरसतील अशी शक्यता होती. मात्र, दुपारनंतर वातावरण निरभ— होत गेले. कडकडीत ऊनही पडले. यामुळे अनेकांनी सायंकाळी खरेदीसाठी घराबाहेर पडण्याचा बेत केला. मात्र, पाचच्या सुमारास अचानक वातावरण ढगाळ झाले. अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत शहराच्या पूर्वेकडील कदमवाडी, भोसलेवाडी, बापट कॅम्प, लोणार वसाहत, शिवाजी विद्यापीठ परिसर आदी परिसरासह पुणे-बंगळूर महामार्ग, शिरोली, सरनोबतवाडी, उचगाव आदी ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झाला.
मेघगर्जनेसह शहराच्या मुख्य परिसरात सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. आभाळ फाटल्याप्रमाणे आठ-दहा मिनिटे पाऊस नुसता कोसळला. वरून पाणी ओतल्याप्रमाणे मुसळधार सुरू होती. यामुळे आठ-दहा फुटांवरील दिसायचेही बंद झाले. अवघ्या आठ-दहा मिनिटांतच रस्त्यावर पाणी साचायला लागले. बघता बघता शहरातील पाणी साचणार्या नेहमीच्या जागी अर्धा-एक फूट पाणी साचले.
पावसाचा जोर इतका होता की, अनेक रस्त्यांनाच नाल्याचे स्वरूप आले. मोठ्या प्रमाणात दगड-धोंडे, कचरा सोबत घेऊन पाण्याचे लोटच रस्त्यावरून वाहत होते. यामुळे अनेक दुकानांत, रस्त्याकडील घरांतही पाणी शिरले. अचानक आलेल्या या पाण्याने नागरिकांची तारांबळ उडाली. राजारामपुरी मुख्य रस्त्यावरून पाणी वाहत येत जनता बझार चौकात जमा होत होते. यामुळे या चौकात काही काळासाठी जलाशयासारखीच स्थिती झाली होती.
परिख पुलात दीड फुटापर्यंत पाणी साचले. त्यातून वाहने पुढे नेणे शक्यच नव्हते. तरीही काहींनी धाडसाने वाहने घातली. ती बंद पडत होती. काहीजण धक्का देत ती वाहने बाहेर काढत होती. पाणी पातळी अधिक असल्याने पावणेसहा ते सव्वासहा असा सुमारे अर्धा तास पुलाखाली वाहतूक बहुतांश बंदच राहिली. साईक्स एक्स्टेंशन परिसरातही पाण्याचे लोटच वाहत होते.
सीपीआर चौक ते कसबा बावडा मार्गावर तीन ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली. जयंती नाल्यावर फूटभर पाणी होते. पुढे मेरीवेदर मैदान आणि रेणुका मंदिरसमोर साचलेल्या पाण्यातून वाहने पुढे नेताना दमछाक होत होती. यामुळे काही मिनिटे वाहतूक बंदच राहिली. जयंती नाल्यावर साचलेल्या पाण्यातून वाहने पुढे काढता येत नसल्याने अनेकांनी ती मागे घेत दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे जाणे पसंत केले. मात्र, स्टेशन रोड ते महावीर महाविद्यालय मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि केव्हिझ पार्क समोरील रस्ते जलमय झाले होते. रेणुका मंदिर परिसरात काही घरात पाणी शिरले.
ताराराणी चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रस्त्यावरील हे पाणी शेजारील हॉटेलसह दुकानांतही शिरले. दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, सीपीआर चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ताराराणी चौक ते शिवाजी विद्यापीठ या रस्त्यावर दोन ठिकाणी पाणी साचले होते. याखेरीज सायबर ते एससीसी बोर्ड, देवकर पाणंद, हॉकी स्टेडियम परिसर, रामानंदनगर – कळंबा रस्ता आदींसह उपनगरातील अनेक लहान-मोठ्या रस्त्यावरही पाणी आले होते.
मुसळधार पाऊस आणि साचलेले पाणी यामुळे शहराच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला. अनेक मार्ग काही काळ ओस पडले. पावसाचा जोर काहीसा कमी झाला आणि रस्त्यावर वाहनेच वाहने झाली. यामुळे प्रमुख मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. ताराराणी चौकात धैर्यशील हॉलच्या दिशेने सदर बाजार चौक, मध्यवर्ती बसस्थानकाकडून येणारी वाहने फूल मार्केटपर्यंत, उड्डाणपुलावरून येणार्या वाहनांच्या शिवाजी पार्क रस्त्यापर्यंत रांगाच होत्या. अशीच अवस्था दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर आणि जयंती नाल्यावर होती. वाहतुकीची कोंडी इतकी झाली होती की, एरव्ही दोन-तीन मिनिटे लागणार्या ठिकाणांसाठी आज सायंकाळी 15 ते 20 मिनिटे लागत होती. यामुळे एसटी आणि केएमटी वाहतुकीचे वेळापत्रकही कोलमडले. त्याचा फटका प्रवाशांना बसला.
शाळा सुटण्याच्याच वेळी पाऊस आला. यामुळे शेकडो विद्यार्थी शाळेतच अडकून पडले. पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. शासकीय कार्यालयातही नागरिक, कर्मचार्यांना सायंकाळी उशिरापर्यंत थांबावे लागले. दिवाळीसाठी काहीच दिवस राहिल्याने अनेक व्यापारी, विक्रेत्यांनी मांडव घालून साहित्यांची विक्री सुरू केली आहे. पावसाने या व्यापारी, विक्रेत्यांची अक्षरश: दैना उडवली. अनेकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी साहित्य भिजले, वाहून गेले. मांडवाचे नुकसान झाले. पावसापासून साहित्य सुरक्षितस्थळी हलवताना प्रचंड दमछाक झाली. अनेकांनी साहित्य झाकून ठेवले.
गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज पावसाचा तडाखा मोठा होता. यामुळे बाजारपेठा ओस पडल्या. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठा, मंडईत गर्दी कमी होती. साडेसहानंतर पावसाचा जोर कमी झाला. यानंतर रात्री साडेसात – आठ वाजेपर्यंत बहुतांशी ठिकाणचे पाणी ओसरले. मात्र, त्यानंतरही विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होत होता. यामुळे अनेकांनी घराबाहेर पडण्याचेच टाळले.