कोल्हापूर : पानलाईनला आणायला गेलो पान, अन् खड्ड्यात पडून मोडली माझी मान

कोल्हापूर : पानलाईनला आणायला गेलो पान, अन् खड्ड्यात पडून मोडली माझी मान

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा :  'लक्ष्मीपुरीत पान लाईनला आणायला गेलो पान, येता-येता खड्ड्यात पडून मोडली माझी मान..' म्हणत कवींनी कोल्हापूर शहरातील खड्ड्यांमध्ये गाडी चालवून झालेली नागरिकांची अवस्था मांडली. शहरात दर्जेदार रस्त्यांसाठी सुरू असलेल्या आम आदमी पार्टीच्या जागर आंदोलनात गुरुवारी कवींचा मेळा भरला.

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधून दर्जेदार रस्त्यांच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर जागर आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी महापालिकेच्या गैरकारभारावर 'कवी संमेलन' भरविण्यात आले. यात अनेक कवी मनाच्या लेखकांनी व कवींनी रस्त्यांच्या दर्जावर विडंबनात्मक काव्य सादर करून आंदोलनात भाग घेतला. ज्येष्ठ कवी अशोक भोईटे, सुरेखा वाडकर, मारुतराव सम—ाट, अजिंक्य पंडत, सचिन वणिरे, बाबुराव बाजरी, दत्तात्रय बोंगाळे आदी कवींनी रस्त्यांच्या दर्जावर विडंबनात्मक काव्य सादर करून महापालिकेच्या कारभारावर आसूड ओढले.

'कोल्हापूरच्या खड्ड्यात आपटून झिजले माझ्या मणक्याचे मणी, अनाठायी पैसे खर्च होतो त्याला कोण धनी..?' असे म्हणत महापालिकेने वारंवार रस्ते दुरुस्तीवर पैसा खर्च करूनदेखील दर्जा सुधारत नाही व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे कवितेतून मांडले. कार्यक्रमाचे नियोजन अभिजित कांबळे, बाबुराव बाजारी यांनी केले. यावेळी अमरजा पाटील, पल्लवी पाटील, स्मिता चौगुले, संजय साळोखे, संतोष घाटगे, सूरज सुर्वे उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news