कोल्हापूर पर्यटन : सुविधांची वानवा

कोल्हापूर पर्यटन : सुविधांची वानवा
Published on
Updated on

कोल्हापूर; सागर यादव : 'करवीर काशी' असे धार्मिक महत्त्व, 'छत्रपतींची राजधानी' असे राजकीय महत्त्व, 'शाहूनगरी' असा सामाजिक वारसा, निसर्गसंपन्न जिल्हा, चमचमीत खाद्यपदार्थांचा वारसा जपणारे शहर आणि विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणार्‍या कोल्हापूरला दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक भेट देतात. मात्र, कोल्हापुरात येणार्‍या पर्यटकांसाठी ( कोल्हापूर पर्यटन ) आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे वास्तव आहे.

यात्री निवासांत सुविधांचा अभाव ( कोल्हापूर पर्यटन )

शहरात पर्यटकांसाठी ठिकठिकाणी यात्री निवास सुरू करण्यात आले आहेत. यातील बहुतांशी यात्री निवासांना महापालिकेची परवानगी नसल्याचे वास्तव आहे. मिळेल त्या जागेत दाटीवाटीने यात्री निवास थाटण्यात आले आहेत. यात पर्यटकांच्या सुरक्षिततेबरोबरच सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे वास्तव आहे. पाणी, स्वच्छता, पार्किंग, सीसीटीव्ही या गोष्टींची वानवा आहे.

खड्डेमय रस्ते अन् बेशिस्त वाहतूक ( कोल्हापूर पर्यटन )

कोल्हापुरात प्रवेश करणारे बहुतांशी रस्ते खड्डेमय आहेत. डागडुजी-दुरुस्तीअभावी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. लहान-मोठ्या खड्ड्यांतून वाट काढत प्रवास करावा लागतो. शिवाय, शहरातील वाहतूकही बेशिस्त आहे. बहुतांशी लोक वाहतुकीचे कोणतेही नियम पाळत नसल्याने पर्यटकांना वाहन चालविणेही मुश्कील होत आहे. पार्किंगची व्यवस्थाही नीट नसल्याने पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रिक्षासारखी स्थानिक प्रवास यंत्रणाही यासाठी पूर्णपणे सक्षम नाही.

पर्यटकांना मार्गदर्शनाचा अभाव ( कोल्हापूर पर्यटन )

कोल्हापुरात येणार्‍या पर्यटकांना मार्गदर्शनाचा अभाव आहे. शासकीय पातळीवर यासाठी कोणतीही विशेष उपाययोजना अस्तित्वात नाही. अंबाबाई मंदिर परिसरातील एमटीडीसी केंद्र व काही खासगी संस्था सोडल्या, तर इतर कोठेही मार्गदर्शक व्यवस्था नाही. एस.टी. महामंडळ व 'केएमटी'ची 'कोल्हापूर दर्शन' बस व्यवस्था बंद झाली आहे. इतकेच नव्हे, तर पर्यटनस्थळांकडे जाणार्‍या रस्त्यांवरही दिशादर्शक फलकांची वानवा आहे. पर्यटनस्थळे व संग्रहालयांमध्ये गाईडची व्यवस्थाही नाही.

'कोल्हापुरी' वस्तूंची होतेय बदनामी ( कोल्हापूर पर्यटन )

कोल्हापूरचे वैशिष्ट्य असणारे कोल्हापुरी चप्पल, फेटा, गूळ, साज, चटणी, मसाले अशा वस्तूंची खरेदी पर्यटक आवर्जून करतात. मात्र, यातही अनेक वस्तूंमध्ये हलक्या प्रतीच्या, बनावट वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. यामुळे पर्यटकांना या वस्तू स्वस्त मिळत असल्या, तरी त्या अस्सल नसल्याने (ओरिजनल) लगेच खराब होतात. यामुळे एकूणच कोल्हापूरच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची बदनामी होते.

जीव मुठीत धरून पर्यटकांची पायपीट ( कोल्हापूर पर्यटन )

मोठ्या ट्रॅव्हल्स, बस, ट्रॅव्हलर अशा वाहनांतून येणार्‍या पर्यटकांची वाहने दसरा चौकात पार्क करण्याच्या सूचना वाहतूक विभागाकडून केल्या जातात. मात्र, तेथून ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी 'केएमटी' किंवा तत्सम वाहनांची व्यवस्था नसल्याने बहुतांशी आबालवृद्ध पर्यटकांना दसरा चौक ते ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळांपर्यंत दसरा चौक, सीपीआर चौक, महापालिका चौक, छत्रपती शिवाजी चौक किंवा लक्ष्मीपुरी, बिंदू चौक या प्रचंड रहदारीच्या मार्गांवरून पायपीट करावी लागते.

शहरात दोनशेहून अधिक यात्री निवास असून, बहुतांशी ठिकाणी पर्यटकांकडून त्यांच्या आर्थिक परिस्थितीकडे बघून मोठ्या प्रमाणात भाडे आकारले जाते. मात्र, त्यामानाने पाणी व तत्सम सोयीसुविधा व सुरक्षिततेच्या उपाययोजना दिल्या जात नाहीत. एजंट लोकांना कमिशन देऊन पर्यटकांना ग्राहक बनविले जाते.

– राजू मेवेकरी, अध्यक्ष, श्री महालक्ष्मी अन्नछत्र व धर्मशाळा

कोल्हापुरी चप्पलचे पर्यटकांना विशेष आकर्षण आहे. अस्सल चामड्याच्या चपलांची किंमत 1,000 ते 2,000 रुपयांवर आहे. मात्र, पर्यटकांकडून स्वस्त वस्तूंची मागणी होत असल्याने चामड्याऐवजी रबर, प्लास्टिक व तत्सम गोष्टींपासून तयार केलेल्या बनावट चपलांची विक्री होत आहे.

– दीपक खांडेकर, कोल्हापुरी चप्पल व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news