कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पूर्वीच्या काळासारखे परदेशात जाऊन शिक्षण घेणे अवघड राहिलेले नाही. इंटरनेट व उपलब्ध रोजगाराच्या संधीमुळे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा ट्रेंड वाढतो आहे. येत्या चार वर्षांत विद्यार्थी शिक्षणाचे प्रमाण 10 लाखांपेक्षा जास्त असेल, असे प्रतिपादन परदेशी शिक्षणाबाबतचे तज्ज्ञ प्रा. जयंत पाटील यांनी केले.
'परदेशी शिक्षणाच्या व करिअरच्या संधी' या विषयावर ते बोलत होते. प्रा. पाटील यांनी विविध देशांचा इतिहास तेथे असणार्या शैक्षणिक संस्था, फी याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्रा. पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षांपूर्वी परेदशात जाऊन शिक्षण घेणे आर्थिक सुबत्ता व गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची मक्तेदारी होती. आता सामान्य विद्यार्थीही परदेशात सहज शिक्षण घेऊ शकतो. अलीकडील काळात विशेषत: युक्रेन-रशिया युद्धानंतर परदेशात देशातील किती विद्यार्थी शिकतात, याची माहिती केंद्र सरकारला समजली.
देशात दरवर्षी 16 लाख नवीन इंजिनिअर तयार होतात. परंतु त्यांना नोकरी मिळेतच असे नाही. एका सर्व्हेनुसार 92 टक्के पदवीधर विद्यार्थी हे नोकरीसाठी पात्र ठरत नाहीत. कारण त्यांच्यात कौशल्याचा अभाव असतो. त्यामुळे पर्यायी मार्ग शोधावे लागतात.
सद्य:स्थितीत पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रम, मेडिकल, इंजिनिअरिंगसाठी परदेशात जाण्याचा प्रघात वाढला आहे. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, न्यूझीलंड, साऊथ कोरिया, जॉर्जिया, बोन्सिया या देशांत कमी खर्चात व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत.
काही देशांत मनुष्यबळाची कमतरता आहे. शिक्षण घेताना रोेजगारची संधी मिळते. अद्ययावत तंत्रज्ञान, प्रात्यक्षिकांवर भर, मोठा पगार यामुळे विद्यार्थी परदेशी शिक्षणाकडे आकर्षित होतात. टेक्नॉलॉजी, आयटी, फार्मा या क्षेत्रात करिअर करण्यास विद्यार्थी इच्छुक असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेताना विकसित देशांचा पर्याय निवडावा. आवडत्या क्षेत्रात करिअर केल्यास यश व आर्थिक संपन्नता आणणे सहज शक्य
आहे.