कोल्हापूर : पंचगंगेने गाठला तळ; लाखो लिटर सांडपाणी थेट नदीत

कोल्हापूर : पंचगंगेने गाठला तळ; लाखो लिटर सांडपाणी थेट नदीत
Published on
Updated on

कोल्हापूर; आशिष शिंदे : जूनचा पहिला पंधरवडा उलटून गेला, तरी पावसाला सुरुवात झालेली नाही. यामुळे नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत. पंचगंगेनेदेखील तळ गाठला आहे. जिल्ह्यात पाणीबाणीसारखी स्थिती उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीतदेखील दररोज लाखो लिटर मैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे. आधीच कमी झालेली पाण्याची पातळी, त्यात पिकनिक पॉईंट, राजाराम बंधारा येथून थेट नदीत मिसळणारे मैलामिश्रित सांडपाण्याचे लोंढे पंचगंगेला गटारगंगा बनवत असून प्रदूषणाची दाहकता वाढली आहे. परिणामी, नदीकाठच्या गावांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अनेक वर्षांपासून पंचगंगा प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. कचरा, प्लास्टिक, बाटल्या आणि दररोज हजारो लिटर मिसळणारे सांडपाणी सोबत घेऊनच पंचगंगा वाहत आहे. अशात पिकनिक पॉईंर्टखालून वाहणार्‍या नाल्यातून दररोज हजारो लिटर मैलामिश्रित पाणी थेट नदीत मिसळत आहे. याशिवाय राजाराम बंधार्‍याच्या दोन्ही बाजूंनी सांडपाणी नदीत मिसळते. सांडपाण्याचे प्रमाण वाढल्याने नदीला पुन्हा जलपर्णीचा विळखा बसू लागला आहे. याप्रश्नी महापालिकेला वारंवार नोटिसादेखील देण्यात आल्या असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

नदीपात्र झाले कोरडे; मात्र सांडपाण्याचे प्रमाण कायम

नदीतील पाण्याची पातळी अधिक असताना काही प्रमाणात सांडपाणी मिसळल्यास त्याचा फारसा काही परिणाम दिसून येत नाही. कारण, पाणी प्रवाही असते व पाणी पातळी अधिक असते. यामुळे प्रदूषणकारी घटकांचे डाल्युशेन होऊन त्याची तीव्रता कमी होते. मात्र, सध्या नदीची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. असे असले तरी सांडपाणी मिसळण्याचे प्रमाण मात्र कायम आहे. यामुळे प्रदूषणाची दाहकता वाढली आहे.

शहरात तयार होते 104 एमएलडी मैलामिश्रित सांडपाणी

शहरात दररोज 104 एमएलडी मैलामिश्रित सांडपाणी तयार होते. यातील 102 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. उरलेले दोन एमएलडी सांडपाणी विनाप्रक्रिया तसेच सोडले जाते. यावर महापालिकेकडून ब्लिचिंग पावडरचा डोस तसेच फायटोरिड पद्धतीचा वापर करून मैला हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जाते.

पाणी पातळी कमी झाल्याने सांडपाण्याची तीव्रता वाढणार आहे. परिणामी, पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. नदीचे पाणी पिण्यासाठी वापरताना शुद्ध करूनच वापरावे.
– डॉ. पी. डी. राऊत, पर्यावरणतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news