कोल्हापूर : नीट पीजी पात्रता प्रशिक्षण कालावधीला मुदतवाढ!
कोल्हापूर; राजेंद्र जोशी : केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आगामी शैक्षणिक वर्षातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी (नीट पीजी- 2023) मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार या परीक्षेसाठी आता पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या आणि प्रशिक्षण कालावधीत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांची कट ऑफ डेट 30 जूनऐवजी 11 ऑगस्ट 2023 करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी एका पत्रकाद्वारे हा निर्णय जाहीर केला आहे.
केंद्राने नीट पीजी- 2023 मच्या पात्रतेसाठी वाढविलेली ही दुसरी मुदतवाढ आहे. या परीक्षेसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 13 जानेवारी रोजी एका प्रकटीकरणाद्वारे 31 मार्च रोजीच्या पहिल्या तारखेला मुदतवाढ देताना 30 जून 2023 ही तारीख निश्चित केली होती. मंगळवारी दुसर्या मुदतवाढीत ही तारीख 30 जूनपासून 11 ऑगस्ट 2023 अशी निश्चित करण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या आणि प्रशिक्षण कालावधीत कार्यरत असलेल्या अधिकाधिक तरुण डॉक्टरांना पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयानुसार राष्ट्रीय परीक्षा मंडळानेही तसे प्रकटीकरण केले असून, आता 1 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत ज्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होतो आहे, अशा विद्यार्थ्यांनाही पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी प्रविष्ठ होता येणार आहे. या विद्यार्थ्यांना आता 9 फेब—ुवारी रोजी दुपारी 3 वाजल्यापासून परीक्षेचे अर्ज भरता येतील.
संबंधित अर्ज भरण्याची अंतिम मुदत 12 फेब—ुवारी रात्री 11 वाजून 55 मिनिटांपर्यंत असेल; मात्र अशा विद्यार्थ्यांना इतर आवश्यक ते निकष पूर्ण करावे लागणार आहेत.
प्रथम येणार्यास प्राधान्य
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नव्या मुदतवाढीचा लाभ मिळालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडताना पहिल्या प्रवेश अर्ज फेरीनंतर जागा रिक्त राहिलेल्या शहरांच्या निवडीचा पर्याय आहे. ही पहिली फेरी 27 जानेवारी रोजी झाली होती. या फेरीत ज्या शहरांतील केंद्रांमध्ये जागा उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी विद्यार्थी अर्ज करू शकतात. मात्र, त्यासाठीही प्रथम येणार्यास प्रथम पसंती असा निकषही ठेवण्यात आला आहे.