

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : बरखास्त केलेल्या निराधार योजनांच्या नव्या समित्या अद्याप कागदावरच आहेत. एकीकडे नव्या समितीत नियुक्ती व्हावी यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे, तर दुसरीकडे या योजनेच्या लाभासाठी प्रयत्न करणार्या निराधारांची फरफट सुरू आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन राज्यस्तरांवरील योजनांद्वारे, तर इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा आणि दिव्यांग योजनांद्वारे निराधारांना दरमहा एक हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मुळातच हे अनुदान तोकडे आहे, ते वाढविण्याची एकीकडे मागणी होतच आहे. मात्र, दुसरीकडे हे अनुदानही वेळेत मिळत नाही, तसेच नव्याने या योजनेत समाविष्ट होणार्या निराधाराला हेलपाटे मारावे लागतात.
लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारून ते मंजूर करण्यासाठी मतदारसंघनिहाय समित्या असतात. मात्र, राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नव्या सरकारने जुन्या सरकारच्या कालावधीतील या सर्व समित्या बरखास्त केल्या. यानंतर मात्र आता सुमारे पाच महिन्यांचा कालावधी उलटला आहे तरीही नव्या समित्यांची रचना झालेली नाही.
पूर्वीच्या समित्या बरखास्त केल्यानंतर सध्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्यांचे कामकाज सुरू आहे. मात्र, तहसीलदारांकडे असणारा अन्य कामांचा व्याप याचा विचार करता सध्याच्या समित्यांमुळे नव्याने लाभार्थी होऊ पाहणार्यांची काहीशी फरफटच चालू आहे.
दरम्यान, या योजनेतील लाभार्थ्यांना लवकरच थेट बँक खात्यात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. एका योजनेद्वारे येत्या चार दिवसांत त्याचा प्रारंभ केला जाणार आहे. टप्प्याटप्याने उर्वरित सर्व योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
संजय गांधी निराधार योजना लाभार्थी- 49,050
संजय गांधी निराधार योजना (एससी)-7,721
श्रावण बाळ निवृत्ती वेतन-70,430
श्रावण बाळ निवृत्ती वेतन (एससी)-11,727
एकूण लाभार्थी 1,38,928
इंदिरा गांधी वृद्धापकाळ- 21,421
इंदिरा गांधी विधवा योजना-2,375
इंदिरा गांधी दिव्यांग योजना- 150