

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावे, अशी मागणी रविवारी सकल हिंदू समाजातर्फे विराट जनआक्रोश मोर्चाद्वारे करण्यात आली. लव्ह जिहादविरोधात या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमण महाशिवरात्रीपूर्वी न काढल्यास महाशिवरात्रीदिनी कारसेवेद्वारे अतिक्रमण काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या विराट मोर्चात जिल्ह्यासह परजिल्ह्यांतूनही हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात तरुणी, महिलांची संख्याही लक्षणीय होती.
सकल हिंदू समाजातर्फे लव्ह जिहादविरोधात रविवारी विराट मोर्चा काढण्यात आला. बिंदू चौकातून सुरू झालेला मोर्चा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, शिवाजी चौकमार्गे भवानी मंडप येथे आला.
अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका
भवानी मंडप कमानीसमोर मोर्चाचे रूपांतर विराट सभेत झाले. हिंदुत्ववादी नेते सुरेश चव्हाण यांनी आपल्या भाषणात केवळ एक दिवस राजकारण करा, धर्मकारण मात्र कायम करा, असे आवाहन केले. चव्हाण यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली.
या देशातील हिंदू भगिनींवर लव्ह जिहादच्या नावाखाली अत्याचार होत असताना आम्ही किती दिवस गप्प राहायचे? देश लव्ह जिहादमुक्त करण्यासाठी प्रथम कोल्हापूर लव्ह जिहादमुक्त झाले पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.
आधी जिहादी संपवा
लव्ह जिहाद, लँड जिहाद असे विविध प्रकारचे जिहाद संपविण्यासाठी आधी जिहादी संपविले पाहिजेत. त्यासाठी त्यांच्यासह त्यांचे समर्थन करणार्यांवर आर्थिक बहिष्कार टाकावा. लग्नास मुली मिळत नसल्याच्या निषेधार्थ हिंदू युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा मशीद, मदरशांवर मोर्चा काढला पाहिजे, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.
…तर गुढीपाडव्याला 'चलो मुंबई'चा नारा : चव्हाण
जगभरात लव्ह जिहाद समस्या केवळ भारतात नसून, जगभर आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्रातून आवाज उठला पाहिजे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून झाल्याचे सांगून चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहादविरोधी आणि गोहत्याविरोधी कायदा करावा. गुढीपाडव्यापूर्वी लव्ह जिहादविरोधी कायदा न झाल्यास गुढीपाढव्यादिवशी 'चलो मुंबई'चा नारा देणार आहे, असा इशारा चव्हाण यांनी दिला. नववर्ष गुढीपाडव्यादिवशी साजरे करावे, असे आवाहन करून चव्हाण यांनी ओवैसी बंधूंवर सडकून टीका केली. मुलींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हक्कांची जाणीव करून द्या, त्यांना स्वसुरक्षेसाठी लाठीकाठी, तलवारबाजीचे प्रशिक्षण द्या. हिंदुत्ववादी संघटनांना विरोध न करता त्यांना मदत करा, आठवड्यातून एक तास हिंदुत्वासाठी द्या, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.
50 आमदार फुटल्याची चर्चा होते; मात्र 50 लाख हिंदूंच्या धर्मातरांची चर्चा नाही
चव्हाण म्हणाले, 50 आमदार फुटल्याची चर्चा होते. 50 लाख हिंदूंच्या धर्मांतरांची मात्र चर्चा होत नाही. पक्ष कोणताही असो, हिंदूंनी एक दिवसासाठी राजकारण; तर उर्वरित सर्व दिवस धर्मकारण करावे. सिंधी समाज हा हिंदू बांधव आहे. त्यामुळे या समाजास साथ द्यावी. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान अंगीकारणारे बौद्धही आपलेच आहेत. 'पठाण' या चित्रपटावर बहिष्कार टाकावा. व्यक्तीवर शाई फेकणे गुन्हा होत नाही; तर मग चित्रपटगृहाच्या पडद्यावर शाई फेकणे हाही गुन्हा होऊ शकत नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.
खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून लव्ह जिहाद : तिवारी
मोर्चाच्या आयोजक राजश्री तिवारी म्हणाल्या, हिंदू मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून लव्ह जिहाद केले जात आहे. विविध अॅप्सच्या माध्यमातून हिंदू मुलींसह महिलांनाही लव्ह जिहादद्वारे फसविले जात आहे. प्रसंगी वेश्या व्यवसायास भाग पाडले जाते, असे भयानक वास्तव आहे. पर्समध्ये मेकअप साहित्याऐवजी मिरचीपूड ठेवा, हे मुलींना सांगितले पाहिजे. एवढेच नाही; तर मुलींना आपला धर्म शिकविला पाहिजे. यावेळी निळकंठ माने, बंडा साळोखे यांचीही भाषणे झाली.
मोर्चातील मागण्या
महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहादविरोधी आणि गोहत्याविरोधी कायदा करावा. विशाळगडसह राज्यातील गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण त्वरित हटवावे. मदरशे बंद करावेत, मुस्लिमांना अल्पसंख्याक मानू नये, 'हम दो, हमारे दो' कायदा करावा, शिवरायांचे नाव न घेणार्यांना महाराष्ट्रातून बाहेर हकलावे, टिपू सुलतानची जयंती साजरी करू नये आदींसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. पालकांनी आपल्या मुलांवर हिंदुत्वाचे संस्कार करावेत, असे आवाहनही यावेळी विविध वक्त्यांनी केले.