कोल्हापूर : दुचाकी चोरांना बेड्या

कोल्हापूर : दुचाकी चोरांना बेड्या
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतून भरदिवसा दुचाकी चोरणार्‍या शाहूवाडी तालुक्यातील टोळीला जुना राजवाडा पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या. त्यांच्यांकडून साडेसहा लाख रुपये किमतीच्या 24 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातीलही वाहन चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहेत.

टोळीचा म्होरक्या अलंकार बाबुराव पाटील (वय 21, रा. सावे, ता. शाहूवाडी), अमर निवास खामकर (25, साखरे गल्ली, शिवाजी स्टेडियमजवळ, मलकापूर, शाहूवाडी), करण विठ्ठल शिंदे (बावी, ता. उस्मानाबाद), अभिषेक सचिन सपाटे (20, रा. मलकापूर), सुशांत बबन कांबळे (22, परळे, ता. शाहूवाडी), सुशांत चंद्रकांत गायकवाड (24, येळाणे, ता. शाहूवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य संशयित अलंकार पाटील, अमर खामकर यांना न्यायालयाने 21 जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. उर्वरित संशयितांना रविवारी (दि.19) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

संशयितानी वाहन चोरीच्या 24 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. टोळीने कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्यासह कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, चिकोडी, हुबळी परिसरातही चोरीचे गुन्हे केले असावेत, असा संशय शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी व्यक्त केला. चोरट्यानी जुना राजवाडा 10, शाहूपुरी 5, लक्ष्मीपुरी 5, गांधीनगर व कळे पोलिस ठाण्यांतर्गत प्रत्येकी एका गुन्ह्याची कबुली दिली आहे. महागड्या दुचाकी चोरीसाठी एक आणि विक्रीसाठी दुसरी टोळी कार्यरत होती, अशी माहिती चौकशीत निष्पन्न झाली आहे, असेही चव्हाण, नाळे यांनी सांगितले. टोळीत सहापेक्षा अधिक संशयितांचा समावेश असावा, असेही सांगण्यात आले.

अधिकारी, पोलिसांनी केले वेशांतर

पोलिस निरीक्षक नाळे यांनी उपनिरीक्षक अभिजित इंगळे, संदीप जाधव, प्रशांत घोलप, परशुराम गुजरे, सागर डोंगरे यांच्यासह कर्मचार्‍यांचे विशेष पथक नियुक्त केले होते. अलंकार पाटीलसह टोळीचा पथकाला संशय आला होता. गुरुवारी (दि.16) अधिकारी, पोलिसांनी वेशांतर करून फुलेवाडी, रंकाळा तलाव, अंबाई टँक, बोंद्रेनगर परिसरात सापळा रचला. मुख्य संशयित पाटील व खामकर विनानंबर प्लेट दुचाकीवरून अंबाई टँक रिक्षा थांब्याजवळ थांबले होते. संशयावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीअंती सायंकाळी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. मुख्य संशयित अलंकारसह साथीदारांनी रंकाळा व उचगाव (ता. करवीर) परिसरात भाड्याने खोली घेतली होती.

...अन् सुरू केली चोरी

संशयित अलंकारसह साथीदार एका कंपनीत कामाला होते. मात्र, लॉकडाऊन काळात कंपनीतील सर्व उलाढाल ठप्प झाली. या काळात झालेल्या कामगार कपातीत अलंकारसह साथीदारांची नोकरी गेल्याने दुचाकी चोरीचा त्यांनी मार्ग स्वीकारला.

पथकाला 20 हजारांचे रोख बक्षीस

दुचाकींची चोरी करणार्‍या टोळीला जेरबंद करणार्‍या अधिकारी, पोलिसांच्या पथकाला अधिकारी चव्हाण, नाळे यांनी व्यक्तिगत 20 हजारांचे बक्षीस दिले. पथकातील संदीप माने, सतीश बांबरे, प्रीतम मिठारे, अमर पाटील, संदीप पाटील, योगेश गोसावी, संदीप बेंद्रे, गौरव शिंदे, तुषार भोसले, नाकील यांनी परिश्रम घेतले.

चैनी अन् मौजमजेसाठी केल्या चोर्‍या

मुख्य संशयितासह त्याचे साथीदार सधन कुटुंबातील आहेत. नोकरीवर गदा आल्याने मौजमजा आणि चैनीसाठी पैसे कमी पडत होते. झटपट कमाईसाठी संशयितांनी दुचाकी चोरीचा मार्ग निवडला. त्यांनी चोरलेल्या दुचाकींच्या विक्रीसाठी समांतर टोळी तयार केली होती. रोज पाच, सहा हजारांची कमाई होऊ लागल्याने सहा महिन्यांपासून टोळीचे कारनामे सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news