कोल्हापूर : दिव्याचे ‘दिव्य’ यश

कोल्हापूर : दिव्याचे ‘दिव्य’ यश
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे रंगलेल्या एमपीएल 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत गतविजेती नागपूरची महिला ग्रँडमास्टर व अवघ्या सतरा वर्षांच्या प्रतिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने साडेनऊ गुणांसह विजेतेपदाचा मान पटकाविला. जेतेपदासह दिव्याला आकर्षक चषक व सहा लाख रुपयांचा रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सर्वांचेच लक्ष लागलेल्या पहिल्या पटावर स्पर्धेत निर्विवादरीत्या वर्चस्व राखणार्‍या दिव्याने आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि तंत्रकौशल्याच्या बळावर अर्जुन पुरस्कार प्राप्त गोव्याच्या आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ती कुलकर्णीला चुरशीच्या सामन्यात दिमाखात विजय मिळवीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भक्तीला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

चौथी मानांकित पेट्रोलियम स्पोर्टस् बोर्डच्या महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्स हिने कोल्हापूरची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ऋचा पुजारी यांच्यातील प्रदीर्घ लढतीत मेरीने अंतिम पर्वात उत्कृष्ट डावपेच आखत ऋचाला पराभूत करत दुसरे स्थान पटकाविले. मेरीने उपविजेतेपदासह रोख रक्कम रु. पाच लाख रुपयांची घसघशीत कमाई केली.

अग्रमानांकित दिल्लीची महिला ग्रँडमास्टर वंतिका अग्रवाल व आयुर्विमा महामंडळाची महिला ग्रँडमास्टर निशा मोहोता यांच्यातील लक्षवेधक लढतीत वंतिकाने कल्पक चाली रचत 58 व्या चालीला विजय संपादन केला. वंतिकाने साडेआठ गुणांसह तिसरा क्रमांक व चार लाखांचे रोख पारितोषिक प्राप्त केले. महाराष्ट्राची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर साक्षी चितलांगे हिने नेत्रदीपक खेळ करत केरळच्या महिला फिडे मास्टर ए. जी. निम्मीचा पराभव करत चौथा क्रमांक मिळवीत तीन लाखांचे बक्षीस पटकाविले.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ संजय घोडावत युनिव्हर्सिटीचेे चेअरमन उद्योगपती संजय घोडावत व ध्यानचंद पुरस्कार विजेते व भारतीय संघाचे प्रशिक्षक ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news