कोल्हापूर : …तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील – सुषमा अंधारे

कोल्हापूर :  …तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील – सुषमा अंधारे
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  भाजपमधील अंतर्गत धुसफुस आणि शिंदे गटातील नाराजी यामुळे 2023 मध्ये राज्यात मध्यावधी निवडणुका होतील. गद्दार आमदारांमुळे ज्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले त्याच पदावर त्यांना पुन्हा विराजमान करण्याचा निर्धार प्रत्येक शिवसैनिकांनी करावा, असे आवाहन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित महाप्रबोधन यात्रेनिमित्त येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात त्या बोलत होत्या.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी बीकेसीचा मेळावा व शिवसेनेचा दसरा मेळावा कसा झाला याचा व्हिडीओ लावला. या मेळाव्यातून महाराष्ट्राचा कौल काय आहे हे समजले आहे. भाजपला सत्ता न मिळाल्याने राज्यात ते द्वेषाचं राजकारण करत आहेत. कोल्हापुरातील दोन आमदार व दोन खासदार त्यांच्या या राजकारणाला बळी पडले, पण कोल्हापूरची जनता सूज्ञ आहे. त्यांना आगामी निवडणुकीच्या रिंगणात चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या. राज्यातील उद्योग गुजरातला गेल्यामुळे राज्यात युवकांवर बेरोजगारीची वेळ आल्याचेही त्या म्हणाल्या.

शिवसेना उपनेत्या सुजाता घाडी यांनीही केवळ मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचा आरोप केला.

जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी कोल्हापुरातून दोन आमदार व दोन खासदार शिवसेनेतून बाहेर पडले. पण राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता ज्यांना मत नाही तेही पद वाचवण्यासाठी गाडीच्या टपावर बसून गुवाहाटीला गेल्याचे सांगितले. मी पक्षासोबत राहिलो, पण मला न्याय मिळाला नाही असे सांगत फिरत आहेत. यापुढील काळात त्यांनी निवडणुकीला उभे राहून दाखवावे जनता त्यांना उत्तर देईल, असे सांगितले. शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी यापुढे महापालिकेच्या निधीत 18 टक्के कोणी खाल्ले याचा जाब विचारला जाईल, असे सांगितले. या मेळाव्यात जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळोखे, डॉ. सुजित मिणचेकर, बाजीराव पाटील, शुभांगी पोवार, स्मिता सावंत, विराज पाटील, प्रतिज्ञा उत्तुरे, अवधूत साळोखे व पदाधिकारी उपस्थित होते.

अन् सभागृहात एकच हशा पिकला

शिवसेना पक्षाशी गद्दारी करून गुवाहाटीला गेले हे मी बोलणार नाही… कारण तसे बोलले तर कारवाई होईल. सगळे ओके असे म्हणत अंधारे सर्व काही बोलून गेल्या अन् सभागृहात एकच हशा पिकला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news