कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी, सानेगुरुजी आणि वि. स. खांडेकर यांची जीवन विचार, मूल्य, आदर्शाचे दर्शन डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या साहित्य लेखनात दिसून येते. मदतीला संस्थात्मक रूप देऊन सर्वांना मित्रभावाने वागणूक देणारे ते अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहेत, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी काढले.
ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा केशवराव भोसले नाट्यगृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आठ गौरवग्रंथांचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. डॉ. मोरे म्हणाले, 'डॉ. लवटे यांचे लेखन वास्तवाला धरून आहे. जगण्याला त्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याने ते आदर्श आहेत.' पंतप्रधानांचे भाषा सल्लागार, ज्येष्ठ लेखक डॉ. दामोदर खडसे म्हणाले, 'समाजाकडून अवहेलना मिळाल्याने द्वेष, दुर्गुण माणसात निर्माण होतात. मानसिक वृत्तीस झुगारून परिश्रम व संघर्षातून प्रगती करणारे डॉ. लवटे यांच्यासारखी मोठी माणसे आहेत. वि. स. खांडेकर यांना अनुवादीत साहित्याच्या माध्यमातून विविध भाषांमध्ये देशभर पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. ते आधुनिक कबीर आहेत.'
सत्काराला उत्तर देताना डॉ. लवटे यांनी जीवनपट उलगडला. ते म्हणाले, 'दहा वर्षांच्या वनवासातून समाजाने जग फार मोठे असल्याचे शिकविले. ज्यांनी नको म्हटले त्यांनी कात्रजचा घाट दाखविला. मात्र, मी समुद्र शोधत गेलो. देशाला विज्ञानवादी, अंधश्रद्धामुक्त बनविण्यासाठी डॉ. दाभोळकर यांच्या विचारांची गरज आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना न्याय मिळाला नाही. आज माणूस म्हणवून घेणे परवडत नाही. जाती-धर्माच्या पलीकडे माणूस जोडण्याची गरज आहे. पुरोगामी-प्रतिगामी लढाई पुरे झाली असून आता नवे काहीतरी करण्याची गरज आहे. भारत आर्थिक महासत्ता व महाराष्ट्र पुरोगामी आहे ही सूज आहे. रस्ते, पूल हे विकासाचा चेहरा नसून सामान्यांचे जीवन उन्नत झाल्यावरच देश महासत्ता होईल.'
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, 'जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकजण दु:ख उगळत बसतो. दु:ख पाठीवर टाकल्यावर प्रगती होणार आहे. डॉ. लवटे यांच्या 72 वर्षांच्या जीवन प्रवासातून हे दिसून येते. जमीन व आकाश व्यापून टाकण्याचे काम त्यांनी केले आहे.' याप्रसंगी डॉ. लवटे यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. दळवीज आर्टस्च्या विद्यार्थ्यांचे डॉ. लवटे यांच्या भावमुद्रा रेखाचित्र प्रदर्शन मांडण्यात आले होते. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी डॉ. लवटे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मानपत्राचे वाचन सागर बगाडे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप मगदूम यांनी केले. आभार समीर देशपांडे यांनी मानले. यावेळी प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. अर्जुन चव्हाण, प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, प्रा. सी. एम. गायकवाड आदी उपस्थित होते.