कोल्हापूर : जोतिबा विकासासाठी प्रयत्न

कोल्हापूर : जोतिबा विकासासाठी प्रयत्न

कोल्हापूर : सागर यादव

दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक जोतिबा डोंगरावर येतात. सर्वाधिक लोक चैत्र यात्रेला उपस्थित असतात. यामुळे जोतिबाच्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग, जिल्हा प्रशासन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि जोतिबा ग्रामपंचायत अखंड कार्यरत असते.

डोंगर सीसीटीव्हीच्या कक्षेत

कोरोनामुळे गेली दोन वर्षे जोतिबाची चैत्र यात्रा झाली नव्हती. यामुळे यंदाच्या यात्रेला सलग सुट्ट्यांमुळे तब्बल आठ लाख भाविकांची उपस्थिती गृहीत धरून जय्यत तयारी जिल्हा प्रशासन व देवस्थान समितीने केल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. जोतिबा परिसरातील सर्व पार्किंगतळांसह संपूर्ण डोंगरावर सीसीटीव्हीचा 'वॉच' असणार आहे. याचबरोबरच संपूर्ण डोंगर परिसरात कायमस्वरुपी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. गायमुखमार्गे जाणार्‍या पारंपरिक पायी रस्त्यावरही लाईट-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दर्शन मंडप, दर्शनासाठी स्क्रीन

मंदिरासभोवती दर्शनासाठी भाविकांच्या रांगा कमी करून दर्शन मंडपात व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 10 हजार लोक एकाचवेळी या दर्शन मंडपात असतील. दर्शन मंडपाच्या शेवटच्या (चौथा) मजल्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जोतिबा देवालयाच्या शिखरांचे वॉटरप्रूफ्रिंग करण्यात आले आहे. सेंट्रल प्लाझाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. एमटीडीसी परिसरातील उद्यान विकासाचे काम सुरू आहे.

पाण्यासाठी विशेष यंत्रणा

पिण्याच्या पाण्यासाठी विशेष यंत्रणा राबविण्यात आली आहे. 5 लाख लिटरच्या दोन टाक्या, 13 ठिकाणच्या टाक्यांची स्वच्छता, जागोजागी पाणपोई व टँकरमधून पाणी यासह गायमुखात खालून पाणी वर चढविणे अशा उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

हुल्लडबाजी रोखण्यासाठी विविध उपाययोजना

हुल्लडबाजी रोखण्यासाठी जोतिबाकडे जाणार्‍या सर्व रस्त्यांवर व परिसरात तीन दिवस दारूबंदी, सर्व सासनकाठ्यांना क्रमांक, सोबतच्या कार्यकर्त्यांना एकसारख्या वेशभूषेची (युनिफॉर्म) सक्ती, अशा उपाय-योजना करण्यात आल्या आहेत.

भेसळयुक्त गुलाल, खोबर्‍याची वाटी विक्रीवर बंदी

यात्रा सुरक्षित व्हावी यासाठी भेसळयुक्त गुलाल व खोबर्‍याची अखंड वाटी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. रांगोळी व तत्सम गोष्टींची भेसळ गुलालात होत असल्याने भाविकांच्या डोळ्यांना इजा होण्याचा धोका असतो. तसेच गुलालासोबत खोबर्‍याची अखंड वाटी उधळली जात असल्याने त्यामुळे भाविक जखमी होतात. यावर देवस्थान समितीच्या वतीने उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news