

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील तरुण उच्च रक्तदाबाच्या विळख्यात सापडले आहेत. जिल्ह्यातील 30 टक्के नागरिक उच्च रक्तदाब आजाराचे आहेत. यामध्ये 19 ते 29 वयोगटातील 14 आणि 30 मे 39 वयोगटांतील 20 टक्के रुग्ण आहेत. गंभीर बाब म्हणजे 16 वर्षाच्या आतील मुलेही रक्तदाबाला बळी पडत आहेत. यामध्ये मुले 20 तर मुलींचे प्रमाण 26 टक्के इतके आहे. हृदयरोग तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासामधून हे निरीक्षण समोर आले आहे.
देशात 23.7 कोटी नागरिक उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. पाच वर्षांत उच्च रक्तदाबाच्या रुग्णसंख्येत सरासरी 3 ते 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्राचे प्रमाण हे 27 असून मुंबई, सातारा, गडचिरोली येथे सर्वाधिक 32 टक्के तर कोल्हापुरात 30 आहे. पाच वर्षांपूर्वी कोल्हापूरची हीच टक्केवारी 27 टक्के होती. बदलती जीवनशैली याला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. वेळीच वैद्यकीय सल्ला आणि हृदयरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दिनचर्येमध्ये बदल केल्यास उच्च रक्तदाबावर नियंत्रण शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
ताण, लठ्ठपणा, धूम—पान, जास्त मिठाचे प्रमाण अनियंत्रित आहार ही उच्च रक्तदाबाची कारणे आहेत. लक्षणे नसतानाही अनेकांना तपासणीनंतर रक्तदाब असल्याचे निदान होते. घाम फुटणे, डोके दुखणे, पायाला सूज येणे, कारण नसताना अशक्तपणा वाटणे, चालताना, जिना चढताना दम लागणे ही याची लक्षणे आहेत.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणात भाज्यांचा समावेश आणि रात्रीच्या जेवणात फळाचा समावेश असावा. स्निग्धांश नसलेले दूध आणि कमी स्निग्धांश असलेले दुधाचे पदार्थ यांचा वापर दिवसातून तीन वेळा घेतला पाहिजे. मटणचे प्रमाण जेवणाच्या एक तृतीयांश कमी करावे. या गोष्टीचे तंतोतंत पालन केलेल्या नागरिकांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो, असे डॉक्टरांनी
सिगितले.
उच्चरक्तदाब असलेल्यांनी मिठाचे सेवन कमी करावे. मांसाहार टाळावा. तळलेले पदार्थ खाऊ नयेत. फळे, उकडलेले कडधान्य, सॅलड खावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोज किमान तीन किलोमीटर भरभर चालावे. त्याबरोबरच सायकलिंग, पोहणे, एरोबिक्स आदी व्यायाम करावा.
-डॉ. विजय नागावकर, हृदयरोग तज्ज्ञ