

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलिस प्रशासन दिवसरात्र कर्तव्य बजावत आहे. यासाठी अडीच हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. गणेश आगमनासाठी शहर-जिल्ह्यात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुकीच्या नेटक्या नियोजनामुळे बापट कॅम्प, शाहूपुरी, गंगावेस परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यात यश आले.
घरगुती गणेश आगमनावेळी कुंभारवाड्यांकडे जाणार्या रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी अनेक ठिकाणी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. यामुळे कुंभार गल्लीमधील वाहतूक कोंडी टाळणे शक्य झाले. शहरासह प्रमुख गावांमध्ये गणेश आगमन मिरवणुकांसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राजारामपुरीमध्ये रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. या ठिकाणी 350 हून अधिक पोलिस, होमगार्डची नेमणूक करण्यात आली होती. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, जयश्री गायकवाड यांच्यासह उपअधीक्षक, सर्वच पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, राज्य राखीव दलाची तुकडी, होमगार्ड असा बंदोबस्त होता.