कोल्हापूर : चिमुकल्यांची शिक्षणासाठी पायपीट

कोल्हापूर : चिमुकल्यांची शिक्षणासाठी पायपीट
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : मेघोली धरण क्षेत्रात दुर्गम डोंगराळ भागात धनगर समाजाची वस्ती असून, एकेक मैलावर एखाददुसरे घर आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील चिमुकल्यांची शिक्षणासाठी चाललेली पायपीट आजही थांबलेली नाही. चिमुकल्यांना ना पायात साधी चप्पल, ना डोक्यावर पावसापासून संरक्षण करणारा प्लास्टिकचा कागद, डोंगरमाथ्यावरून 5 ते 6 कि.मी. अंतर पार करताना मध्ये येणारे ओढे, जंगली प्राणी यांचे अडथळे दूर करत प्राथमिक शिक्षणासाठी शाळेची पायरी गाठावी लागते. शहरी सुख-सुविधांपर्यंत मर्यादित राहिलेले सरकारही 'सीमोल्लंघन' करून या पाड्यापर्यंत पोहोचू इच्छित नसल्याने या चिमुकल्यांची पायपीट अशीच सुरू राहणार की काय, असा प्रश्न येथील पालकांना पडला आहे.

उन्हाळ्यात हे विद्यार्थी जंगलातील झाडांच्या सावलीत थोडा वेळ विश्रांती करून शाळेत येतात. तर हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत सकाळच्या वेळी जंगलातील गवत गोळा करून शेकोटी करत पुढे सरकतात. सध्या तर या रस्त्यावर तीन-साडेतीन फूट उंचीचे गवत वाढले आहे. त्यामुळे या गवतातूनच वाट काढत हे विद्यार्थी शाळा गाठतात.

पावसातून शाळेत जाताना हे विद्यार्थी ओलेचिंब होतात, त्याच कपड्यात ते दिवसभर असतात, यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून, त्यांची ही पायपीट कमी करण्यासाठी या भागातील रस्ता प्रथम करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शाळा सुटल्यावर त्याच रस्त्याने घरी पोहोचतात. अनेक अडथळ्यांचा त्यांचा हा मार्ग जीवघेणा आहे. त्यातही डोंगरवस्तीत घरे असल्यामुळे विजेचा प्रश्न आहेच, मेणबत्ती आणि पणतीच्या मिणमिणत्या प्रकाशात ते आपल्या आयुष्याची प्रकाशवाट शोधताहेत.

शिसवाड या परिसरातील लहानग्यांना प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी मोठे हाल सोसावे लागताहेत. येथील अनेक मुली सुरक्षितता आणि कुटुंबाच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली आजही शिक्षणापासून वंचित असून, वयात येताच त्यांची लग्ने लावून दिली जातात. तर जी मुले प्राथमिक शिक्षणामधून अक्षर ओळख समजून घेतात, ती वयाच्या 12 व्या वर्षी मुंबईतील हॉटेलमध्ये कप-बशा धुण्यासाठी जातात. शिक्षणाच्या प्रवाहात येण्याचा या चिमुकल्यांचा हक्क असून, त्यांचीही इच्छा आहे. मदत नको; शाळेसाठी रस्ता द्या, अशी व्यथा परिसरातील आमदाराच्या दारी अनेकदा मांडण्यात आली. मात्र, आजवर त्यांच्या समस्येचे निराकरण झालेले नाही. त्यांना कोणीच वाली आजवर भेटला नाही. त्यांची या जीवघेण्या मार्गातून सुटका होणार तरी कधी?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news