कोल्हापूर : चाळोबावाडीची शाळा इमारत चोरीस

कोल्हापूर : चाळोबावाडीची शाळा इमारत चोरीस

आजरा; पुढारी वृत्तसेवा : किणे पैकी चाळोबावाडी (ता. आजरा) येथील मराठी प्राथमिक शाळेची इमारत चोरीला गेल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तसेच आजरा पंचायत समितीच्या गलथान कारभाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्यापासून आजअखेर चाळोबावाडी गावात शिक्षणाची कोणतीही सुविधा अगर शाळा इमारत नाही. फक्त बालवाडी सुरू असून, इयत्ता पाचवीपर्यंतची मुले एकाच भाडोत्री खोलीत बसवून शिकविली जातात. चाळोबावाडीमध्ये 1997 साली शासनाकडून एक शाळा

खोली इमारत मंजूर झाली होती. तत्कालीन सरपंच पांडुरंग दळवी यांनी गट नंबर 657 या जागेमध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण करून घेतले. अद्यापही ती इमारत अस्तित्वात आहे. मात्र, आजरा पंचायत समिती बांधकाम विभाग व शिक्षण विभाग अधिकार्‍यांनी इमारतीचा ताबा घेऊन ग्रामपंचायत विभागाकडे हस्तांतरित न करता शासनाचे सर्व पैसे खर्च केले. निवेदनावर वसंत नाईक, सुनील वांजोळे, विजय नाईक, संजय गावडे, ओमकार फुलगोंडे, सुबराव नांदवडेकर, बाबू पारपोलकर, साधना वांजोळे यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत.

गुन्हा दाखल करण्याची मागणी
सध्या चाळोबावाडीतील बाबू रामा वांजोळे व त्यांच्या मुलांनी अनधिकृतपणे या इमारतीचा ताबा घेतला आहे. बेकायदेशीरपणे ते या इमारतीचा वापर करीत आहेत. त्यामुळे गावातील लहान मुले उघड्यावर पडली आहेत. आजरा पंचायत समितीच्या अधिकार्‍यांच्या ही बाब अनेक वेळा निदर्शनास आणूनदेखील कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे या घटनेला जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच शाळा इमारतीचा दांडगाईने वापर करणार्‍यांवर देखील गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news