कोल्हापूर : गॅस पाईपलाईनचे 60 टक्के काम पूर्ण

कोल्हापूर : गॅस पाईपलाईनचे 60 टक्के काम पूर्ण

कोल्हापूर; सचिन टिपकुर्ले : घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडत असताना ऑईल कंपन्यांकडून पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोल्हापूर शहर, इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लजमधील पाईपलाईनचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. गॅस पाईपलाईनमुळे सिलिंडवरील 40 टक्के खर्चात बचत होणार असल्याचा दावा केला जात आहे.

दाभोळहून बंगळूरला गेल कंपनीद्वारे हिंदुस्थान पेट्रोलियम, ऑईल इंडिया यांच्याकडून पाईपलाईनद्वारे सीएनजी गॅसपुरवठा केला जात आहे. हाच गॅस घरगुती व औद्योगिक वापरासाठी चालणार आहे. मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथून कोल्हापूर शहर व जिल्ह्याला पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा केला जाणार आहे. कोल्हापूर शहरातील अनेक भागांत गॅसच्या पिवळ्या रंगाच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत; पण जिथे दाटीवाटीची वस्ती आहे अशा ठिकाणी सुरक्षिततेची तपासणी करूनच पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.

सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर एक हजार रुपयांवर गेला आहे. तसेच ग्राहकांना गॅस वितरकांकडे जाऊन सिलिंडर घेणे किंवा घरी गॅस येण्याची वाट पाहावी लागते. पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा झाल्याने ग्राहकांना सतत पुरवठा होणार आहे. यासाठी प्रत्येक घरात मीटर बसविले जाणार आहे. जेवढा गॅसचा वापर होईल तेवढा दर आकारला जाणार आहे. कोल्हापूर शहरातील अनेक हॉटेलमध्येही पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. तसेच औद्योगिक वसाहतींमध्येही आता पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा केला जाणार आहे. गोकुळ शिरगाव, शिरोली एमआडीसी व कागल एमआयडीसीतील उद्योगांना कच्चा माल वितळवण्यासाठी विजेऐवजी गॅसचा वापर केल्यास एकूण वीज बिलात 50 टक्के बचत होणार आहे. अद्याप पंचगंगा नदीपलीकडील भागात पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. ते कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. सुरुवातीला 10 हजार ग्राहकांना पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा केला जाणार आहे. नंतर उर्वरित तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने काम पूर्ण होणार आहे.

उद्योग, हॉटेल व्यवसायासाठी पाईपलाईनद्वारे गॅस फायदेशीर उद्योग तसेच हॉटेल व्यवसायाला पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा झाल्यास त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. फौंड्री उद्योगासाठी याचा फायदा होणार आहे. औद्योगिक दराने वीज 9 ते 10 रुपये प्रतियुनिट आकारली जाते. जर गॅसचा वापर झाला तर त्याचा प्रतिकिलोचा दर यापेक्षा कमी असणार आहे. हॉटेल व्यवसायालाही कमर्शिअल दराने सिलिंडर घ्यावे लागते. पाईपलाईनद्वारे गॅस मिळाल्यास त्यांनाही फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news