

राधानगरी; पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणी राधानगरी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. संजय आप्पासो गोंधळी (रा. सुळकूड, ता. कागल) व विठ्ठल हिंदुराव निकम (वय 39, रा. सावर्डे दुमाला, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी दहा जणांना यापूर्वीच अटक केली आहे.
या गुन्ह्यात 18 संशयित निष्पन्न झाले असून त्यातील 12 जणांना अटक करण्यात आली. गजेंद्र ऊर्फ सनी बापूसो कुसाळे (रा. सिरसे, ता. राधानगरी), ओंकार कराळे (रा. सडोली ता. करवीर), राजेंद्र यादव (रा. कारभारवाडी, ता. करवीर), डॉ. प्रसाद देंगे (रा. मडिलगे बु., ता. भुदरगड) हे अद्याप फरारी आहेत.
तपासादरम्यान संजय गोंधळी याने मिरज व कागल तालुक्यातील महिलांना गर्भलिंग चाचणीकरिता यापूर्वी अटकेत असणारा श्रीमंत पाटील याच्याकडे पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील विठ्ठल हिंदुराव निकम हा 12 वीपर्यंत शिकलेला असून तो यापूर्वी आर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून नोकरीस होता. सध्या तो पन्हाळा तालुक्यात वैद्यकीय व्यवसाय करत आहे. त्याने यापूर्वी राजेंद्र यादव याच्याकडून गर्भलिंग चाचणी करून स्त्री अर्भक असलेल्या महिलांच्या घरी जाऊन गर्भपात केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोन्हीही आरोपींना न्यायालयात हजर केले असता दि. 28पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.