कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी प्रदीर्घ काळ लढा सुरू आहे. अजूनही कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील पक्षकार, वकिलांच्या मागणीला शासन व न्याय व्यवस्थेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अलीकडच्या काळात लोकलढ्याला आलेली मरगळ झटकून खंडपीठासाठी सहाही जिल्ह्यांत व्यापक लढा उभारण्यात येईल, असे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष अॅड. सर्जेराव खोत यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
अध्यक्ष अॅड. खोत यांच्यासह निवडणुकीत विजयी झालेल्या कार्यकारी मंडळाने सकाळी पदभार स्वीकारला. तत्पूर्वी राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या सत्कार समारंभात अॅड. खोत बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञांसह वकिलांची उपस्थिती मोठी होती.
अॅड. खोत पुढे म्हणाले, कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेसाठी नव्या जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे. सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनच्या अध्यक्षांसह कार्यकारिणी व खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन वाटचाल करावी लागणार आहे. खंडपीठांसह ज्युनिअर वकिलांचा स्टायपेंटचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. कोणताही दुजाभाव न करता सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्यावर आपला भर असेल.
ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले. कोल्हापूर खंडपीठ हा कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील पक्षकारासह वकिलांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. अलीकडच्या काळात आलेल्या मरगळीमुळे हा विषय प्रलंबित पडला आहे. भविष्यात कोल्हापूर खंडपीठासाठी नव्या जोमाने लढा उभारण्याची आवश्यकता आहे.
जिल्हा बार असोसिएशनचे माजी अॅड. रणजित गावडे, अॅड. गिरीश खडके यांनीही खंठपीठाच्या मागणीसाठी लोकसभेच्या निवडणुकीनंतर सहा जिल्ह्यांतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची चर्चा करून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी भेट घेण्याबाबत सूचना केली.
यावेळी झालेल्या चर्चेत ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. शिवाजीराव राणे, धनंजय पठाडे, अॅड. आर. एल. चव्हाण, ए. पी. पोवार, अॅड. सुभाष पिसाळ, अॅड. संपतराव पवार, अॅड. पी. आर. पाटील, अॅड. प्रशांत देसाई, अॅड. अशोकराव पाटील सहभागी झाले होते. यावेळी बार असोसिएशनचे नूतन उपाध्यक्ष अॅड. उमेश माणगावे, निशिकांत पाटोळे, राजू ओतारी, करणकुमार पाटील, सोनाली शेठ, स्नेहलता सावंत, चंद्रकांत कुरणे, सागर घोरपडे आदी उपस्थित होते.