

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : केएमटीच्या पाच मार्गांवरील 19 फेर्यांतून मोठा तोटा होत आहे. या फेर्यांतून केएमटीला फक्त 4 हजार 14 रुपये उत्पन्न मिळत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या फेर्या रद्द कराव्यात, अशी मागणी कॉमन मॅन संघटना आणि प्रजासत्ताक सेवा संस्था, जिजाऊ ब्रिगेड संघटना यांनी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांच्याकडे केली.
प्रशासकांना अहवाल का सादर केला नाही?
केएमटीचे तोट्यातील मार्ग बंद करावेत, या मागणीसाठी अॅड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक गवळी यांची केएमटीत भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी तोट्यातील मार्ग बंद करण्यासाठी केलेल्या सर्व्हेतून कोणती माहिती पुढे आली? तसेच ते मार्ग अद्याप बंद का केले नाहीत? प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना त्यासंदर्भातील अहवाल सादर केला का, अशी विचारणा इंदुलकर व देसाई यांनी केली.
14 कोटी तुटीला जबाबदार कोण?
इंदुलकर व देसाई यांनी केएमटीच्या तोट्यासह विविध कारणांवरून अधिकार्यांना धारेवर धरले. शहरवासीयांकडून कर गोळा करून महापालिका केएमटीला पगारासाठी देत आहे आणि केएमटी तोट्यातील मार्ग चालवून पैशाची उधळपट्टी करत आहे, असा आरोपही केला. जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत केएमटीत तब्बल 14 कोटी 67 लाखांची तूट आली आहे. याला जबाबदार कोण, अशी विचारणा केली. त्यावर अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक गवळी यांनी त्यापैकी सुमारे 12 कोटी रुपये कर्मचार्यांच्या पगारासाठी दिली असल्याचे स्पष्ट केले. तसेच 14 कोटी 67 लाखांतील 11 कोटी 37 लाख रुपये महापालिकेने पगारापोटी अनुदान म्हणून केएमटीला दिल्याचेही सांगितले.
या आहेत 19 फेर्या…
कंदलगाव ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, एस. टी. स्टँड (वेळ 19.20 ते 19.35), एस. टी. स्टँड ते शिवाजी महाराज चौक (19.40 ते 19.55), कंदलगाव ते शिवाजी महाराज चौक, एस. टी. स्टँड (13.25 ते 13.40), एस. टी. स्टँड ते शिवाजी महाराज चौक (13.45 ते 14.00), कंदलगाव ते शिवाजी महाराज चौक, एस. टी. स्टँड (07.30 ते 07.45), एस. टी. स्टँड ते शिवाजी महाराज चौक (07.50 ते 08.05), पेठवडगाव ते महाराणा प्रताप चौक, मुडशिंगी (06.15 ते 06.40), मुडशिंगी ते श्री शाहू मैदान (06.40 ते 07.10), पेठवडगाव ते शिवाजी महाराज चौक, कळंबा (21.25 ते 21.45), कळंबा ते शिवाजी महाराज चौक (21.50 ते 22.10), कळंबा ते शिवाजी महाराज चौक, कळंबा (19.55 ते 20.15), कळंबा ते शिवाजी महाराज चौक (20.15 ते 20.35), कागल ते शाहू मैदान, आर. के. नगर, श्री शाहू मैदान (21.10 ते 21.50), कुडित्रे ते गंगावेस, कुडित्रे गाव (17.20 ते 18.05), कुडित्रे-गंगावेस (18.05 ते 18.50), गंगावेस-कुडित्रे (20.10 ते 20.55), कुडित्रे-गंगावेस (06.35 ते 07.05), गंगावेस-कुडित्रे (09.00 ते 09.40).