कोल्हापूर : कचरा प्रश्‍नावरून अधिकारी धारेवर

नेचर इन नीड
नेचर इन नीड
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कोल्हापूर शहराचाच कचरा होत आहे. चार-चार दिवस टिप्पर वाहने कचरा गोळा करण्यासाठी घरोघरी जात नाहीत. कचरा भरून आलेल्या वाहनांना तो टाकण्यासाठी झूम प्रकल्पाच्या ठिकाणी जागा नाही. महापालिका प्रशासन झोपले आहे का? असा उद्विग्‍न सवाल करत माजी नगरसेवकांनी महापालिका अधिकार्‍यांना धारेवर धरले. कारभार सुधारा; अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही महापालिकेतील बैठकीत देण्यात आला. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. उपायुक्‍त रविकांत आडसूळ उपस्थित होते.

काँग्रेसचे शहराध्यक्ष चव्हाण म्हणाले, काही महिन्यांपासून कचर्‍याचा प्रश्‍न शहरवासीयांना भेडसावत आहे. त्याविषयी वारंवार अधिकार्‍यांना सूचना देऊनही फरक पडलेला नाही. कचरा टाकायला कोंडाळा नाही आणि टिप्पर वाहने फिरकत नाहीत. नागरिकांना घरात चार-पाच दिवस कचरा ठेवावा लागत आहे. काही ठिकाणी टिप्पर वाहने आठ दिवस जात नसल्याच्या तक्रारी आहेत. कचर्‍यासारख्या ज्वलंत प्रश्‍नाकडे महापालिका प्रशासन गांभीर्याने बघत नाही. कचरा प्रकल्पासाठी निधी पाहिजे असल्यास त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करावा. महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांकडून त्यासाठी निधी मिळवू, असेही चव्हाण यांनी सांगितले.

माजी महापौर स्वाती यवलुजे यांनी कचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्याने लाईन बझार परिसरात कचर्‍याचे डोंगर साठत आहेत. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे दिसत आहे, असा आरोप केला. माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी इनर्ट मटेरियल नेण्यासाठी वाहने नाहीत. नवीन प्रकल्प नाहीत. मग प्रशासक करते तरी काय? असा प्रश्‍न उपस्थित केला.

माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर अर्जुन माने, प्रताप जाधव, अशोक जाधव, डॉ. संदीप नेजदार, विनायक फाळके आदी उपस्थित होते.

मोठे टिप्पर घ्या : उत्तुरे

सध्या असलेले टिप्पर लहान आहेत. शहरात अनेक मोठ्या अपार्टमेंट आहेत. एखाद्या अपार्टमेंटमधील कचरा गोळा केल्यानंतर टिप्पर चालक तो घेऊन झूम प्रकल्पाकडे जातो. शहराच्या कानाकोपर्‍यातून कचरा गोळा केल्यानंतर टिप्पर वाहने लाईन बझारमधील झूम प्रकल्पाकडे जातात. त्याठिकाणी कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने दोन-तीन तास थांबतात. अशाप्रकारे आठ तासांत केवळ 2 फेर्‍या केल्या जातात. त्याऐवजी महापालिकेने मोठे टिप्पर घ्यावेत. जेणेकरून एखादी गल्‍ली किंवा परिसर एकावेळेस पूर्ण होऊ शकेल. त्यातून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे महेश उत्तुरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news