

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गायरान जमिनीवर बांधलेल्या एकाही घराला हात लावाल तर याद राखा. प्रशासनाविरोधात तीव्र संघर्ष केला जाईल. अतिक्रमण काढायला येणार्या पथकाला गावांच्या वेशीवर रोखले जाईल, असा इशारा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या विराट मोर्चाद्वारे दिला. राज्य शासनाच्या अतिक्रमण कारवाईला विरोध करण्यासाठी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व आमदार सर्वश्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके आदींनी केले.
…तर जिल्हाधिकारी कार्यालयातच मुक्काम : सतेज पाटील
गायरान जमिनीवरील घरे कायम करण्यासाठी राज्य सरकारने योग्य भूमिका घेतली नाही तर गोरगरीब जनता या सरकारला योग्य धडा शिकवेल, असा इशारा देताना सतेज पाटील म्हणाले, आमचा मोर्चा आम्ही शांततेने आणि संयमाने काढला आहे. यापुढे गायरानावरील अतिक्रमणे काढण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयातच बेमुदत ठिय्या देतील, मुक्काम ठोकतील. गायरानामधील जमिनी ग्रामपंचायतीकडे द्या, गावठाणांची हद्द वाढवा, यासंदर्भात 2022 मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने जीआर काढला आहे. त्याची अंमलबजावणी करा, गोरगरीब वंचित घटकांना न्याय द्या.
…तर रक्तपात होईल : मुश्रीफ
गायरानमध्ये राहणारी जनता गोरगरीब, कष्टकरी आहे. निवाराच नाही म्हणून त्यांनी घरे बांधली, त्यामुळे गोगरिबांचा हा निवारा उद्ध्वस्त करण्याचे काम अधिकार्यांनी करू नये, असे आवाहन करून आमदार हसन मुश्रीफ म्हणाले की, प्रशासनाने जोरजबरदस्ती केली तर वेळप्रसंगी रक्तपात होईल आणि त्याची जबाबदारी शासनावरच राहील. त्यामुळे अतिक्रमणे काढण्याची वेळच आली तर अधिकार्यांनी राजीनामे देऊन घरी बसले तरी चालेल; पण आम्ही एकाही घराला हात लाऊ देणार नाही.
शासनाचे विरोधाभासाचे धोरण : राजू शेट्टी
एका बाजूला सर्वांसाठी घरे ही योजना सरकार काढत आहे. तर दुसर्या बाजूला बांधलेली घरे पाडण्याचे काम करत आहे, हाच मोठा विरोधाभास असल्याचे सांगून माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, प्रशासनाची कारवाई ही लोकशाहीविरोधी आहे. त्यामुळे याविरोधात आम्हाला कडवा संघर्ष करावा लागेल. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी जे काही करावे लागेल ते करा. वेळप्रसंगी कायद्यातही दुरुस्ती करा, अशी मागणी त्यांनी केली.
शासन झोपले होते काय? : ऋतुराज पाटील
गायरानमधील अतिक्रमणे काढण्याला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा इशारा देताच राज्य शासनाकडून सारवासारव सुरू झाली; पण इतके दिवस हे सरकार झोपले होते का? या सरकारने न्यायालयात गोरगरिबांची बाजू का मांडली नाही, असा सवाल आमदार ऋतुराज पाटील यांनी मोर्चाप्रसंगी उपस्थित केला.
गरिबांच्या वाटेला जाऊ नका : नरके
गायरानमध्ये अतिक्रमण करून घरे बांधलेला वर्ग हा कष्टकर्यांचा आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला जाऊ नका, असे सांगून माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मी रस्त्यावरची लढाई करणारा कार्यकर्ता आहे. टोलला टोला दिला तसेच या कारवाईलाही टोला दिला जाईल, असे सांगितले. यावेळी माजी आमदार संपतबापू पाटील, उल्हास पाटील, के.पी.पाटील, विजय देवणे, संजय पवार, बाबासाहेब देवकर, उदय नारकर, सुमित वांजळे यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक रिपब्लिकन पक्षाचे प्रा. शहाजी कांबळे यांनी केले. आभार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी मानले. मोर्चाची सुरुवात दसरा चौकातून झालीर. विविध पक्षांचे झेंडे मोर्चात दिसत होते. 'गायरान आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे' यासह विविध घोषणांनी मोर्चामार्ग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
कोल्हापुरातच एवढी घाई का?
विराट मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. त्यांनतर व्यापक शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना निवेदन दिले. निवेदन देताना आमदार सतेज पाटील यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याची कोल्हापूर जिल्हा प्रशासनालाच मोठी घाई का झाली आहे? असा प्रश्न उपस्थित केला. नजीकच्या सांगली, सातारा या जिल्ह्यात अद्याप काहीच हालचाली नसताना कोल्हापुरातच घाई का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला.
मुश्रीफांनी उडवली नरकेंची कॉलर
माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी आपल्या भाषणात मी रस्त्यावरची लढाई करणारा कार्यकर्ता आहे. 'एक बार मैने कमिटमेंट करली, तो मै अपने आपकी भी नही सुनता' असा फिल्मी डायलॉग म्हटला. यावेळी व्यासपीठावर नरके यांच्या बाजूला उभे असणार्या आमदार मुश्रीफ यांनी नरके यांची कॉलर उडवली, यावेळी उपस्थितात हशा पिकला. तसेच नरके यांच्या भाषणाचा संदर्भ देत मुश्रीफ यांनी त्यांच्या भाषणात रस्त्यावरची लढाई करत बसू नका. शिंदे सरकारसोबत बसून याप्रश्नी मार्ग काढा, असा टोला नरके यांना लगावला.