कोल्हापूर : ‘उत्तर’मध्ये कोट्यवधींचा चुराडा; आचारसंहिता लुळीपांगळी!

कोल्हापूर : ‘उत्तर’मध्ये कोट्यवधींचा चुराडा; आचारसंहिता लुळीपांगळी!
Published on
Updated on

कोल्हापूर : राजेंद्र जोशी

हजार-पाचशेत होणार्‍या निवडणुका आता कोट्यवधी रुपयांच्या मर्यादा ओलांडून गेल्या आहेत. सर्वत्र नोटा आणि प्रलोभनांचा बाजार मांडला जातो आहे आणि निवडणुकीच्या खर्चावर लक्ष ठेवणारी आचारसंहितेची यंत्रणा तर लुळीपांगळी झाली आहे. तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी टी. एन. शेषन यांच्या कारकिर्दीतील आचारसंहिता आठवा. निवडणूक प्रचारात व्हिडीओ कॅमेरे फिरत होते. खर्चाचे हिशेब मागितले जात होते. जेवणावळी, प्रलोभनांवर सक्त नजर होती आणि सरकारी गाड्यांच्या वापरावर कडक बंदी होती.

नुकत्याच झालेल्या 'उत्तर'च्या पोटनिवडणुकीच्या राजकीय धुळवडीमध्ये ही यंत्रणा तुम्हाला कोठे दिसली? कोट्यवधींचा चुराडा दोन्ही बाजूंनी झाला. मतदारांची हॉटेलसमोरील गर्दी उत्तरोत्तर वाढत गेली. पाकिटेही घरोघरी पोहोच झाली. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविलेल्या नानांनी भाजपची मफलर गळ्यात घालून निवडणूक लढविली आणि भाजपच्या तिकिटावर नगरसेविका बनलेल्या जयश्री जाधवांनी काँग्रेसच्या हातावर मतदारांकडे मते मागितली. काँग्रेसला विरोध करणारी शिवसेना काँग्रेसच्या प्रचारात उतरली आणि हिंदुत्ववाद्यांची फळी संभ्रमावस्थेत गेली होती. ज्यांनी काँग्रेसला विरोध केला, ते डावे भाजपविरोधासाठी काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले.

प्रत्येक जण भूमिका हरवल्यासारखा वावरत होता. या वावरण्यानेच कोल्हापूर बदलल्याची धोक्याची घंटा वाजविण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी शेतकरी कामगार पक्षाचे मोठे प्राबल्य होते. दक्षिण महाराष्ट्र ही पक्षाची राजधानी आणि कोल्हापूर हे त्याचे प्रमुख केंद्र होते. कोल्हापुरात निःस्पृहपणे लढणार्‍या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरचा पुरोगामी चेहरा अधिक ठळक केला. पुढे 80 च्या दशकात पक्षाचा प्रभाव उतरणीला लागला आणि तरुण पिढीच्या डोक्यावर लाल टोपीऐवजी शिवसेनेची भगवी टोपी आली. शेकाप अन् त्यानंतर शिवसेनेने काँग्रेसबरोबर कडवी झुंज दिली; पण 20 व्या शतकाच्या अखेरीस आलेल्या युती व आघाडीच्या जमान्याने हे सारे बदलले. ज्यांच्याविरुद्ध राजकीय शत्रुत्व केले, ते मित्र झाले आणि ज्या पक्षातून निवडणूक लढविली, ते प्रतिस्पर्ध्यांच्या तिकिटीवर पुन्हा रिंगणात उतरले.

या सार्‍या घटना कोल्हापूर बदलल्याचे सूचक आहे. त्यामुळे खरा पुरोगामी शोधण्याची वेळ आली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणे देता येतील. शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा गाठलेल्या निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढलेले संभाजीराजे भाजपच्या गोटातून राज्यसभेवर खासदार झाले. राष्ट्रवादीतून खासदार झालेले धनंजय महाडिक भाजपच्या वळचणीला आले. काँग्रेसचे प्रकाश आवाडे काय आणि जनसुराज्यचे विनय कोरे काय, दोघेही भाजपच्या बांधावर उभे राहिले. सरुडकर शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणि पुन्हा शिवसेनेत. पक्षांतराची आणि निष्ठाबदलाची किती उदाहरणे द्यावीत? कोल्हापूरच्या राजकारणाचा 60 वर्षांचा हा बदलता इतिहास आहे. या इतिहासाने कदाचित नेत्यांचे बस्तान बसले असेल; पण कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे आणि यामुळेच कोल्हापूरचे पक्षीय राजकारण उत्तरोत्तर खिळखिळे होत चालले आहे.

जिल्ह्यातील 1960 ते 1980 या दोन दशकांतील निवडणुका आठवा. सायकलवरून फिरून प्रचार करणारे त्र्यंबक सीताराम कारखानीस तब्बल चार वेळेला विधानसभेवर गेले. त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांची फौजही सायकलवरूनच प्रचार करत होती. निवडणुकीचा खर्च हजार-पाचशे म्हणजे खूप होता. विचारांशी प्रामाणिक जनतेच्या लढ्यात संघर्ष होता; पण वैर नव्हते. स्वतःची पिठलं-भाकरी फडक्यात बांधून प्रचार करणार्‍या कार्यकर्त्यांची मांदियाळी कोल्हापूरने पाहिली. श्रमिक-कष्टकर्‍यांना प्रतिष्ठा देणारे कोल्हापूर तेव्हा राज्यात कौतुकाचा विषय ठरले होते; पण आता पाकिटाशिवाय प्रचार नाही. जेवणावळी, मतदारांच्या सहली, प्रलोभने, इतकेच काय घरचे रेशन भरण्यासाठी आणि जेवणासाठी कुपन्स वाटण्यापर्यंत मजल गेली. खरोखरच, कोल्हापूर बदलले
आहे.

सट्टाबाजारालाही लागेना अंदाज!

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात 'काँटे की टक्कर' झाली आहे. अत्यंत अटीतटीच्या लढतीमुळे सट्टाबाजारालाही अंदाज लागेना, अशी स्थिती आहे. गेले काही दिवस कोल्हापुरात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. निवडणुकीच्या मैदानात 15 उमेदवार असले तरी खरी लढाई महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातच आहे. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 90 पैसे भाव असल्याचे सांगण्यात आले. सट्टाबाजारानुसार दोन्ही उमेदवारांना विजयासाठी समान संधी असल्याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news