कोल्हापूर : उचगावातील स्वामी विवेकानंद पतसंस्थेत 46 लाखांचा अपहार

कोल्हापूर : उचगावातील स्वामी विवेकानंद पतसंस्थेत 46 लाखांचा अपहार
Published on
Updated on

गांधीनगर, पुढारी वृत्तसेवा : उचगाव (ता. करवीर) येथील स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत 46 लाखांचा अपहार झाला असून तत्कालीन व्यवस्थापक तलत मियासो मुजावर (रा. चिपरी, ता. हातकणंगले) व रोखपाल तथा लेखनिक तौशिफ मन्सूर पठाण (रा. उचगाव) या दोघांवर गांधीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मुजावर व पठाण या दोघांनी संगनमताने फसवणूक केल्याची तक्रार प्रमाणित लेखापरीक्षक चंद्रकांत पुरुषोत्तम दाणी (वय 63, रा. अबोली बंगला, ब्राह्मण गल्ली, चंदगड) यांनी दिली. तत्कालीन व्यवस्थापक मुजावर नोव्हेंबर 2016 पासून ते 31 मार्च 2021 पर्यंत व रोखापाल पठाण नोव्हेंबर 2010 पासून 31 मार्च 2021 पर्यंत पतसंस्थेत सेवेत होते. या दोघांनी संगनमताने पदाचा गैरवापर करून 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2021 अखेर 46 लाख 6 हजार 975 रुपये रकमेचा अपहार व गैरव्यवहार केला.

संस्थेचा निधी स्वतःसाठी वापर करून संस्था, तसेच सभासद, ठेवीदार यांचा विश्वासघात करून फसवणूक केली. शिल्लक रोजकिर्दीप्रमाणे रक्कम स्वतःकडे ठेवणे, ठेवपावती न घेता परस्पर ठेवतारण कर्ज उचल करणे, धनवर्धीनी ठेवतारण कर्ज येणे यादी व ताळेबंद यादी यामध्ये अनियमित जमाखर्च, ठेव रकमेपेक्षा जादा कर्ज वाटप, नक्तमूल्य वजा असताना भागाचे मूल्यांकन न करता शेअर्स रकमा खर्ची टाकून ही रक्कम स्वतःसाठी वापरून गैरव्यवहार करणे असे मुद्दे तक्रारीत नमूद आहेत.

लेखा परीक्षणावेळी समक्ष हजर राहून खुलासा करण्यासाठी दोन नोटिसा पाठवूनही ते हजर झाले नाहीत. याबाबत फिर्यादी चंद्रकांत पुरुषोत्तम दाणी यांनी जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांच्याकडे अहवाल सादर केला. त्यानुसार साहाय्यक निबंधक सहकारी संस्था करवीर यांनी संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यासाठी फिर्यादी यांना प्राधिकृत केले. दाणी यांच्या तक्रारीनुसार गांधीनगर पोलिस ठाण्यात मुजावर व पठाण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news