कोल्हापूर : आठवडा बाजारात चहा विकणारा हैदर बनला फौजदार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

घरची परिस्थिती जेमतेम. वडील सेंट्रिंग काम करणारे. घर चालविताना येणार्‍या अडचणी पाहून शिरोलीच्या आठवडा बाजारात चार दिवस चहा विकून हैदर शौकत सनदी फौजदार बनले आहेत. त्यांनी मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे.

भादोले (ता. हातकणंगले)हे हैदरचे मूळ गाव आहे. वडील सेंट्रिंग काम करतात. आईच्या मृत्यूनंतर लहानपणापासून शिरोली (पु.) येथील आजी व मामा यांनी सांभाळ केला. गावातच दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर कदमवाडीतील राजर्षी शाहू कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्र विषयातून एमए केले.

त्यानंतर पोलिस भरतीसाठी प्रयत्न केले; मात्र यश मिळाले नाही. शिरोली येथे सोमवार, बुधवार, गुरुवार व शनिवारी आठवडा बाजार असतो. घरून चहा तयार करून आठवडा बाजारात आठ वर्षे विकून कुटुंबास मदत केली. मिळालेल्या वेळेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. दोनवेळा परीक्षेत यशाने हुलकावणी दिली. अखेर 2019 च्या पीएसआय परीक्षेचा दोन वर्षांनंतर अंतिम निकाल लागला असून दुसर्‍या प्रयत्नात उत्तीर्ण झालो.

प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान आहे. पीएसआय झाल्याने एक टप्पा पूर्ण केला आहे. राज्यसेवेची परीक्षा देऊन पोलिस उपअधीक्षक होण्याचे स्वप्न बाळगले आहे.
– हैदर सनदी,
नूतन पोलिस उपनिरीक्षक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news