कोल्हापूर : अन् त्याचा नमस्कार अखेरचाच ठरला!

कोल्‍हापूरचा जवानही बुडाला
कोल्‍हापूरचा जवानही बुडाला
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात आपत्ती व्यवस्थापनाचे रोल मॉडेल ठरलेल्या कोल्हापूरच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनात स्कूबा डायव्हिंग तंत्रज्ञान अवगत असणारा राजशेखर मोरे हा उमदा आपदा मित्र. सदैव हसतमुख, गरज असेल तिथे सर्वात अगोदर पोहोचणारा. म्हणूनच प्रथम जाणार नाही म्हटला, काही वेळाने पुन्हा येतो म्हणाला, आईसह अनेक सहकार्‍यांना जाताना नमस्कार करून गेला. पण त्याचा तो नमस्कार अखेरचाच ठरला. त्याच्या अशा एक्झिटने प्रशासनासह त्याचे सहकारी मित्र सुन्न झाले होते.

माजलगाव (जि. बीड) येथे धरणात बुडालेल्या तरुणाच्या शोधासाठी बीडच्या निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी कोल्हापुरातून स्कूबा डायव्हिंगचे पथक मागवले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने दहा जणांचे पथक बीडला शनिवारी पाठवले. स्कूबा डायव्हिंगमध्ये निष्णात असणार्‍या राजशेखरने तब्येत बरी नाही म्हणून येत नाही असा निरोप पाठवला. त्यावर अन्य सहकार्‍यांनी नको म्हणून सांगितलेही. पण पुन्हा त्याने येत असल्याचा निरोप देत तो जिल्हाधिकारी कार्यालयात आला. काय वाटले आणि पुन्हा तो टिंबर मार्केट येथील घरी गेला. आईला नमस्कार करून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थितांना त्याने नमस्कार सुरू केला. काहींना मिठ्ठीही मारली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संकपाळ यांच्या पायाही पडला. आज त्याचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समजताच सारेच जण सुन्न झाले. त्याचे सहकारी अश्रू ढाळत होते. आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व आपदा मित्र सुन्न अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालयात बसून होते.

राजशेखरला पाचच महिन्यापूर्वी वारसाहक्काने (अनुकंपा तत्त्व) महापालिकेत चालक म्हणून नोकरी लागली होती. सकाळी सात ते दुपारी दोन अशी नोकरी करून तो त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जिल्हा रेस्क्यू फोर्सकडे स्वयंसेवक म्हणून (आपदा मित्र) काम करत होता. तो विवाहित असून त्याला दोन लहान मुलेही आहेत. स्कूबा डायव्हिंगच्या मदतीने जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरही त्याने अनेक मृतदेह शोधून काढले होते. जिल्ह्यात 2019 आणि 2021 साली आलेल्या महापुरातही धाडसी कामगिरी त्याने केली होती.

मदतीसाठी राज्य शासनाला प्रस्ताव सादर करणार

स्वत:चा जीव धोक्यात घालून, केवळ समाजासाठी मदतीच्या भावनाने स्वयंसेवी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनात आपदा मित्र काम करत आहेत. राजशेखरच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासनच्या वतीने त्याच्या कुटुंबीयांकरिता मदतीचा प्रस्ताव राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाला सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी तसा प्रस्ताव तातडीने तयार केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news