कोल्हापूर : ‘अडीच वर्षांत पंचगंगा प्रदूषणमुक्त होणार’

कोल्हापूर : ‘अडीच वर्षांत पंचगंगा प्रदूषणमुक्त होणार’
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  पंचगंगा येत्या अडीच वर्षांत प्रदूषणमुक्त होईल, त्यानुसार कामांचे नियोजन केले असून, त्याच गतीने कामे सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी सांगितले. भविष्यातील 30 वर्षांचा विचार करूनच उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. त्यानुसार पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, या सर्व उपाययोजना प्रत्यक्ष अंमलात येण्यासाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. यानंतरच पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास रेखावार यांनी व्यक्त केला.

शहरातील सहा प्रकल्पांना लवकरच मान्यता

कोल्हापूर शहरासाठी सांडपाणी प्रक्रियेचे (एसटीपी) नवे सहा प्रकल्प राज्याच्या उच्चाधिकार समितीपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केले आहेत. त्याला लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल. त्यानंतर त्यांचे कामही सुरू होईल. शहराची सुमारे 2055 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन हे प्रकल्प तयार केले आहेत. यामुळे कोल्हापूरमुळे होणारे पंचगंगेेचे प्रदूषण जवळपास बंद होईल.

पंचगंगा नदीकाठावरील 40 गावांचे डीपीआर बनवणार

पंचगंगा नदीकाठावरील तसेच प्रदूषणास कारणीभूत ठरणार्‍या 174 गावांपैकी 89 गावांतच निर्माण होणारे सांडपाणी रोखण्यासाठी शोषखड्ड्यांसारख्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र, उर्वरित गावांत ते शक्य नसल्याने आयआयटीच्या माध्यमातून या गावांत एसटीपी उभारले जाणार आहेत. यापैकी 19 गावांचे डीपीआर झाले आहेत. आणखी 40 गावांचे डीपीआर बनविण्याचे काम सुरू आहे.

इचलकरंजीतील प्रकल्पाचे काम पावसाळ्यानंतर सुरू

इचलकरंजीच्या 'नो एमआयडीसी' क्षेत्र असलेल्या परिसरातील उद्योगांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येणार्‍या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे. ऑगस्टपर्यंत त्याचा डीपीआर तयार होईल. डीपीआर सादर करून प्रकल्पाला मान्यता घेऊन, साधारणत: येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीचे काम सुरू होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news