

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या महिला पोलिसांचे कडे तोडत थेट जिल्हा परिषदेत घुसल्या. जिल्हा परिषदेच्या गेटवरून काही महिलांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्व महिला जिल्हा परिषदेचे गेट उघडून घुसल्यामुळे एकच गोंधळ झाला. या महिलांना जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात अडविण्यात आले. सुमारे तीन तास या महिलांनी प्रवेशद्वार रोखले. यानंतर एका शिष्टमंडळाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनने जिल्हा परिषदेवर गुरुवारी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सकाळपासून महिला महावीर उद्यानात एकत्र येत होत्या. दुपारी येथून या मोर्चास प्रारंभ झाला. 'दोन रुपयांचा कडीपत्ता, सरकार झाले बेपत्ता', 'आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा', 'कांदा म्हणे बटाट्याला, लाज नाही सरकारला' आदी घोषणा देत हा मोर्चा जिल्हा परिषदेच्या गेटवर आला.
पोलिसांनी तो अडविण्याचा प्रयत्न केला; परंतु महिला आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि महिलांमध्ये धक्काबुकी झाली. काही महिलांनी गेटवर चढून आत प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ सर्व महिला जिल्हा परिषदेमध्ये घुसल्या. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात त्यांना अडविण्यात आले. यावेळी पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली.
यानंतर एका शिष्टमंडळाच्या वतीने सीईओ चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील उपस्थित होत्या. निवेदनामध्ये अंगणवाडी मदतनिस व सेविकांचे मानधन महिन्याच्या 5 तारखेच्या आत मिळावे, रिक्त जागा त्वरित भराव्यात, खासगी बालवाड्या तत्काळ बंद कराव्यात, मे महिना व दिवाळीच्या सुट्ट्या त्यांच्या सोयीनुसार घेण्याची परवानगी मिळावी, गणवेशाची रक्कम त्वरित मिळावी, सेवानिवृत्तीवेळी एकरकमी लाभ मिळावा, थकीत भत्ते त्वरित द्यावेत आदी मागण्यांचा समावेश आहे. सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी सहा महिने अगोदर त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या. मोर्चात आप्पा पाटील, जयश्री पाटील, सरिता कंदले, शोभा भंडारे, सुरेखा कोरे, मंगल माळी आदी सहभागी झाले होते.