कोल्हापूर: बांबवडे येथे मराठा समाजाचे रास्तारोको आंदोलन; फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

कोल्हापूर
कोल्हापूर
Published on
Updated on

सरूड; पुढारी वृत्तसेवा: मराठा समाज हा लढणारा आहे, रडणारा नव्हे. मराठा समाज हा लाखांचा पोशिंदा आहे. हाच लाख मराठा आता जागा झाला असून, अंदाधुंद सत्तेचे तख्त उलथवून टाकण्यास सज्ज झाला आहे. असा इशारा बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे रास्तारोको आंदोलनावेळी मराठा आंदोलन कार्यकर्त्यांनी महायुती सरकारला दिला आहे. जालन्यातील मराठा आंदोलकांच्या लाठीमारावर राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला आहे. याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील बांबवडे येथे मराठा समाजाने रास्तारोको आंदोलन केले आहे.

 जालना येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या समुदायावर बेछूटपणे लाठीचार्ज करण्यात आला. रबरी गोळीबार झाल्याच्या निर्दयी घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी मराठा महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे रविवारी (ता.३) रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

 यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छ. शाहू महाराज यांचा जयघोष करीत आंदोलकांनी कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्ग रोखून धरला. पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी रास्तारोको न करण्याचे केलेले आवाहन आंदोलकांनी धुडकावून लावले. पोलीस प्रशासनाने समन्वयाची भूमिका घेत आंदोलन चिघळणार नाही याची विशेष खबरदारी घेतली होती. भाजपेत्तर सर्वपक्षीय मराठा समाज, तसेच संघटनांचा या आंदोलनाला सक्रिय पाठींबा मिळाला.

 आरक्षण आमच्या हक्काचे.. नाही कुणाच्या बापाचे.., कोण म्हणतं देत नाही.. घेतल्याशिवाय राहत नाही, असंवेदनशील महायुती सरकारचा धिक्कार असो.., महायुतीचे सरकार पायउतार करा.., अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलकांनी उचलून धरली होती. सुमारे तासभर दुतर्फा वाहतुकीचा खोळंबा. नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पो. नि. राजेंद्र सावंत्रे, एपीएस अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त बजावणाऱ्या शाहूवाडी पोलिसांनी आंदोलकांना शांत करत, तासाभरानंतर वाहतूक सुरळीत केली.

 शेकापचे भारत पाटील, मराठा संघाचे अमर पाटील, स्वाभिमानीचे सुरेश म्हाऊटकर, राजाराम मुगदुम, प्रा. प्रकाश नाईक या सर्वच वक्त्यांनी गृहमंत्र्यांच्या इशाऱ्याशिवाय आंदोलकांवर लाठीचार्ज होऊच शकत नाही, असा आरोप केला. तसेच मराठा समाजावर सातत्याने अन्याय का होतोय ? असा सरकारला रोकडा सवालही केला. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील, सरपंच भगतसिंग चौगुले, राजेंद्र देशमाने, जयसिंग पाटील, राम लाड, दयानंद कांबळे, अभयसिंह चौगुले आदींसह मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news