

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गोवा बनावटीच्या सुमारे 19 लाख 20 हजारांच्या दारू तस्करीप्रकरणी पसार झालेल्या रूईकर कॉलनीतील संशयिताला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अटक केली. गजानन दिनकर पाटील (वय 45) असे त्याचे नाव आहे. भरारी पथकाने 5 डिसेंबरला मध्यरात्री गगनबावड्यापासून ट्रकचा पाठलाग केला होता. संशयिताने शाहूपुरी परिसरात दारूसाठ्यासह ट्रक सोडून पलायन केले होते.
'थर्टीफर्स्ट'च्या पार्श्वभूमीवर गोव्यातून होणार्या दारू तस्करीला रोखण्यासाठी उत्पादन शुल्कच्या भरारी पथकामार्फत महामार्गावर ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत असतानाच गगनबावड्यापासून ट्रकमधून कोल्हापूरकडे गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होणार असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक पी. आर. पाटील यांना मिळाली.
ट्रकसह दारूसाठा ताब्यात घेण्यासाठी पथकाने फिल्डिंग लावलेली असतानाच चालकाने चकवा देऊन ट्रक भरधाव वेगाने कोल्हापूरच्या दिशेने पळविली. अधिकारी, कर्मचार्यांनी ट्रकचा पाठलाग केला. अंधाराचा फायदा घेत ट्रक बसंत- बहार ( असेम्ब्ली रोड) मार्गावर दारूसाठ्यासह पार्किंग करून संशयिताने पलायन केले होते. निरीक्षक पी. आर. पाटीलसह अधिकारी, कर्मचार्यांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.