ए. एस. ट्रेडर्सकडून फसवणूक : संशयितांसाठी शोधमोहीम; कंपनीसह एजंटांची बँक खाती सील

ए. एस. ट्रेडर्सकडून फसवणूक : संशयितांसाठी शोधमोहीम; कंपनीसह एजंटांची बँक खाती सील

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्सकडून झालेल्या फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल झालेला कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर लोहितसिंग सुभेदारसह संचालक व एजंटांच्या अटकेसाठी शाहूपुरी पोलिसांनी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह कर्नाटकात शोधमोहीम जारी केली आहे. शनिवारी ठिकठिकाणी छापेमारीही केली. मात्र रात्री उशिरापर्यंत संशयित हाताला लागले नव्हते. मोबाईल लोकेशननुसार मुख्य संशयिताचे आंध— प्रदेशात वास्तव्य असल्याचे समजते. तपास यंत्रणांनी हैदराबाद पोलिसांशी संपर्क साधला आहे.

दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स या बहुचर्चित कंपनीने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध—ातील लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शोधासाठी व्यापक मोहीम

मुख्य संशयित तथा मॅनेजिंग डायरेक्टर लोहितसिंग सुभेदार, मुख्य व्यवस्थापक विजय जोतिराम पाटील, बाबुराव हजारे, भिकाजी कुंभार यांच्यासह 27 जणांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तपासाच्या अनुषंगाने शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना सूचना दिल्या आहेत. संशयित पसार होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांच्या शोधासाठी व्यापक मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बँक खात्यांतील उलाढालीची चौकशी

फसवणुकीचे गुन्हे दाखल होताच शाहूपुरी पोलिसांनी गुंतवणूकदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. कंपनीसह मुख्य संशयित, संचालक, एजंटांसह कंपनीतील कर्मचारी व कुटुंबीयातील सदस्यांची खाती कोणत्या बॅकेत आहेत याचीही चौकशी सुरू केली आहे. शहरांसह जिल्ह्यातील विविध बँकांशी संपर्क साधण्यांवर भर देण्यात आल्याचेही वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.

पलूस, पुण्याकडे पथके रवाना

मुख्य संशयित लोहितसिंग याचे वास्तव्य असलेल्या नागाळा पार्क, सांगली जिल्ह्यातील पलूस (सांगली) व पुण्यातही पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. कंपनीतील कोट्यवधींच्या रकमा संशयितांनी कोठे कोठे मुरविल्या आहेत याचाही शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुख्यालयासह कार्यालयांना टाळे

कंपनीच्या शाहूपुरी दुसरी गल्ली येथील मुख्य कार्यालयासह एजंटांच्या सर्वच कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले आहे. शनिवारी मध्यरात्री कार्यालयातील महागडे फर्निचर, संगणक संच, कागदोपत्रेही हलविण्यात आल्याची चर्चा
होती. संंबंधित साहित्य कोणामार्फत हलविण्यात आले, याचीही पोलिस चौकशी करीत होते.

संतप्त जमावाने बाऊन्सरला पिटाळले !

ए. एस. ट्रेडर्सचा प्रमुख असलेल्या लोहितसिंग सुभेदार व अन्य संचालकांच्या दिमतीसाठी कंपनीमार्फत दरमहा 40 हजाराच्या पगारावर शहर व परिसरातील 12 कार्यालयांत मुंबई, पुण्यासह कर्नाटकातील 15 बाऊन्सर ठेवण्यात आले होते. कंपनीच्या उलाढालीसंदर्भात संशयास्पद स्थिती निर्माण झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा शाहूपुरी येथील कार्यालयाकडे ओघ वाढला होता. चौकशीसाठी आलेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्याकडून उद्धट वर्तन केले जात होते. शुक्रवारी सकाळी काही गुंतवणूकदारांना दरडावण्याचा प्रकार घडल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. संतप्त गुंतवणूकदारांचा पारा चढताच बाऊन्सरनी तेथून पळ काढला. तर दोघांना पिटाळून लावण्यात आले. आज दिवसभर या घटनेची चर्चा होती.

संशयितांसाठी सहकारातील संचालकाची धडपड चालल्याची चर्चा

ए. एस. ट्रेडर्सकडून फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्यापैकी काही संशयितांचे जिल्ह्यांसह मुंबई येथील राजकीय नेत्यांशी लागेबांधे आहेत. फसवणुकीचे प्रकरण पोलिस ठाण्यांपर्यंत जाऊ नये, यासाठी फसगत झालेल्या गुंतवणूकदारांवर दबावतंत्राचा वापर करण्यात येत होता. गुंतवणूकदारांनी दबावतंत्रांना थारा दिला नाही. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एका संचालकामार्फत मुंबई दरबारी संशयितांना वाचविण्याचे शनिवारपासून प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा होती. या संचालकाने थेट मंत्रालयात व काही ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याचेही बोलले जात होते. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात गुंतवणूकदारांचे एक शिष्टमंडळ पोलिस अधीक्षक बलकवडे व तपास अधिकारी राजेश गवळी यांची सोमवारी भेट घेणार आहे, असेही सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news