इचलकरंजी : पंचगंगा नदीला जलपर्णीचा विळखा

इचलकरंजी : पंचगंगा नदीला जलपर्णीचा विळखा
Published on
Updated on

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : पंचगंगा नदीला जलपर्णीचा विळखा पुन्हा बसत आहे. जलपर्णीखालून दूषित पाणी वाहत आहे. उन्हाळ्यात या प्रदूषणाची तीव्रता आणखीन वाढून जलपर्णीने पंचगंगा नदीचे पात्र व्यापण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. यामुळे जलचरांना पुन्हा एकदा मरणयातना भोगाव्या लागणार आहेत; तर इचलकरंजीसह पंचगंगा नदीवर अवलंबून असणार्‍या गावांच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात येत असून, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी नसल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न कायम आहे.

'नेमिची येतो उन्हाळा' याप्रमाणे आता उन्हाळा सुरू झाला की, पंचगंगा आणि जलपर्णी हे समीकरणच बनले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगा नदीच्या प्रदूषणाच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम आहे. इचलकरंजीत पंचगंगा नदीपात्रामध्ये पुन्हा जलपर्णीचे साम—ाज्य वाढत चालले आहे. जलपर्णीने पंचगंगेला विळखा दिल्याने नदीपात्रातील जलचरांचा श्वास गुदमरत चालला आहे. काही महिन्यांपूर्वी दूषित पाण्यामुळे माशांसह जलचर मृत झाल्याची घटना घडली होती. पंचगंगेच्या बचावासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. मात्र, प्रशासन ढिम्मच आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रशासन हातात हात घालून समन्वयाने प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका जाहीर करतात. मात्र, प्रत्यक्षात त्याची कोणतीच अंमलबजावणी दिसत नाही. परिणामी, पुन्हा जलपर्णीसह प्रदूषणाचा विळखा घट्ट होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जलपर्णी हटवण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे पुन्हा महापालिका आणि सामाजिक संघटनांवर याचा भार पडणार आहे. मात्र, प्रदूषण व जलपर्णी आरोग्यासाठी तसेच जलचरांसाठी धोकादायक आहे. जलपर्णीचा विळखा आणखीन काही महिने घट्ट राहण्याची शक्यता आहे. जलपर्णी हटवण्यासह पंचगंगा नदी संवर्धनासाठी कायमस्वरूपी तोडग्याची आवश्यकता आहे.

पाणी उपशावर होणार परिणाम

इचलकरंजी शहराला कृष्णा नळपाणी योजना व पंचगंगेद्वारे पाणी उपसा करून पुरवठा केला जातो. दररोज शहरात 35 एमएलडीहून अधिक पाणी उपसा करून तो वितरित केला जातो. कृष्णा योजनेच्या गळतीचे शुक्लकाष्ट कायम आहे. त्यातच पुन्हा जलपर्णीचा धोका निर्माण झाला आहे. जलपर्णीवर तातडीने उपाययोजना न झाल्यास भविष्यात पंचगंगेच्या पाणी उपशावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाईची टांगती तलवार कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news