इचलकरंजी : इच्छुकांची वाढली घालमेल..!

इचलकरंजी : इच्छुकांची वाढली घालमेल..!
Published on
Updated on

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द करून पुन्हा चार सदस्यीय प्रभाग करण्याच्या निर्णयामुळे इचलकरंजी महापालिकेसाठी आता 63 ऐवजी सदस्यसंख्या 65 इतकी होण्याची शक्यता आहे.

नवीन प्रभाग रचनेसाठी लागणारा वेळ, वाढलेले प्रभाग व उत्सुकता, यामुळे इच्छुकांच्या टेन्शनमध्ये आणखीनच भर पडली आहे. चार सदस्यांच्या प्रभाग झाल्यामुळे इच्छुक आणखीन हवालदिल झाले आहेत. इचलकरंजी नगरपालिकेची स्थापना संस्थान काळात 1893 साली झाली. शहराचा विस्तार वाढल्याने पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले आहे. इचलकरंजी पालिकेची वेळेत निवडणूक होऊ न शकल्यामुळे प्रशासक नियुक्त करण्यात आले.

या कालावधीतच महापालिका झाल्याने आता आयुक्त प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. पालिकेच्या निवडणुकीसाठी दोनवेळा प्रभाग निश्चिती झाली. आरक्षण सोडतही झाली. मात्र, ते रद्द झाले आहे. महापालिकेसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे 62 नगरसेवक तसेच नगराध्यक्ष, असे निवडीचे चित्र होते. मात्र, शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे चार सदस्यीय प्रभाग व नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून होणार आहे. आता नव्याने प्रभाग निश्चिती, आरक्षण सोडत होणार असल्यामुळे नवीन वर्षातच निवडणुका होण्याची शक्यता आहे.

2011 च्या लोकसंख्येवर आधारित 2017 मध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती. महापालिकेसाठी किमान 76 नगरसेवक असतात. मात्र, नवीन निर्णयामुळे आता सदस्यसंख्या 65 होण्याची शक्यता आहे. 15 प्रभाग 4 सदस्यीय, तर 16 वा प्रभाग 5 सदस्यीय राहण्याचीही शक्यता आहे. दोन पुरुष, दोन महिला व त्यातच आरक्षण, यामुळे इच्छुकांचीही घालमेल वाढली आहे. प्रभागाचा आवाका मोठा राहणार असल्याने राजकीय पक्षांचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. यामुळे अपक्षांची दमछाक होणार आहे.

2011 सालची लोकसंख्या ठरणार अडसर?

इचलकरंजी पालिकेची 2011 मध्ये 2 लाख 92 हजार 646 इतकी लोकसंख्या जाहीर करण्यात आली आहे. महापालिका होताना 3 लाख 6 हजार इतकी लोकसंख्या गृहीत धरली आहे. 2011 सालची लोकसंख्या गृहीत धरल्यास इचलकरंजी महापालिकेसाठी हा निकष अडसर ठरणार आहे. त्यामुळे यावर लोकप्रतिनिधी व प्रशासन कसा मार्ग काढतात व प्रभाग निश्चिती कशी राहणार, याकडेही लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news