

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आ. डॉ. विनय कोरे आणि आ. प्रकाश आवाडे यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी माजी खासदार कल्लाप्पाना आवाडे व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याबाबतही छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना, कसबा बावडा येथे चर्चा झाली.
भाजप व एकनाथ शिंदे (शिवसेना गट) यांनी राज्यात सरकार स्थापन केले आहे. यावेळी भाजपला आवाडे व कोरे यांनी पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यातील दोन्ही नेते ज्येष्ठ व अनुभवी आहेत. त्यांचा राजकीय लाभ येणार्या महापालिका, नगरपालिका जिल्हा परिषद व साखर कारखाना निवडणुकीत भाजपला होणार आहे. याचा विचार करून आवाडे आणि कोरे यांना मंत्रिपद देऊन मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशी मागणी माजी खासदार आवाडे व माजी आमदार महाडिक यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे मंगळवारी केली आहे.
यावेळी राजाराम साखर कारखाना अध्यक्ष दिलीप पाटील, वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य राहुल आवाडे आदी उपस्थित होते.