कोल्हापूर : पावणे नऊच्या आत…डॉक्टर आरोग्य केंद्रात

कोल्हापूर : पावणे नऊच्या आत…डॉक्टर आरोग्य केंद्रात

कोल्हापूर : आरोग्य विभागाच्या वतीने पावणे नऊच्या आत, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असलाच पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांच्या बैठका घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अनुपस्थिती किंवा उशिरा येण्याबाबतच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जातात. प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण तपासणीची वेळ सकाळी पावणे नऊ ते दुपारी साडेबारा आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 अशी आहे. परंतु, प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी दहा वाजले तरी अनेक ठिकाणी डॉक्टर येत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. काही प्राथमिक आरोग्य केंद्रात तर वैद्यकीय अधिकारीच आपल्या परिचारकांना रुग्णांना तपासून गोळ्या द्यायला सांगत असत. काही गावांनी तर वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात दाखवा आणि बक्षीस मिळावा, असे फलक गावांमध्ये लावण्याचे प्रकार काही वर्षांपूर्वी घडले होते. गावांतून तक्रार आली, तर त्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकार्‍यांना सूचना दिल्या जायच्या. दोन-चार दिवस बदल दिसायचा, परत त्याच तक्रारी यायच्या.

डॉ. राजेश गायकवाड यांनी जिल्हा आरोग्याधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आढावा घेण्यास सुरुवात केली. नागरिक तक्रार घेऊन येऊ लागले. येणार्‍या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी आरोग्य केंद्रात डॉक्टर वेळेवर येत नसल्याच्या होत्या, असे निदर्शनास आल्यामुळे डॉ. गायकवाड यांनी, यामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन सुधारणा करण्याचे ठरविले आणि त्यांनी बारा तालुक्यांचा दौरा करून तेथील अधिकार्‍यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांच्या अडचणी समजून घेत असताना डॉ. गायकवाड अधिकार्‍यांना आपल्या जबाबदारीची जाणीव देखील करून देत होते. प्राथमिक आरोग्य केंद्राची वेळ ठरलेली आहे.

त्यानुसार आरोग्य केंद्रात उपस्थित राहण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकार्‍यांसह त्याठिकाणी काम करणार्‍या सर्वांचीच आहे. एवढेच डॉ. गायकवाड सांगत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये आता बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे.

डीएचओंनी तपासले रुग्ण

तालुक्याचे दौरे करत असताना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राजेश गायकवाड वाटेत प्राथमिक आरोग्य केंद्र दिसले की जायचे माहिती घ्यायचे. हे करत असताना एका आरोग्य केंद्रात दहा वाजले तरी वैद्यकीय अधिकारी आले नसल्याचे दिसले. त्यांनी त्याठिकाणी थांबून सर्व रुग्णांची तपासणी केली, त्यानंतर तेथील डॉक्टर आले. असा अनुभव त्यांना सहा ते सात प्राथमिक आरोग्य केंद्रांत आला. त्या सर्वांना त्यांनी सूचना दिल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news