

गांधीनगर, पुढारी वृत्तसेवा : दोनशे रुपयांच्या उधारीवरून उचगाव (ता. करवीर) येथील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात गणेश नामदेव संकपाळ (वय 40, रा. गणेश कॉलनी, उचगाव) याचा निर्घृण खून करण्यात आला. गुरुवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. पानपट्टीच्या पैशाच्या उधारीवरून संकपाळ याचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. विकी ऊर्फ व्यंकटेश संजय जगदाळे (20, रा. चपाले गल्ली,) रतनकुमार रमेश राठोड (20), ओम गणेश माने, (21, तिघेही रा. उचगाव), रोहन गब्बर कांबळे (20, रा. टेंबलाई नाका रेल्वे फाटक), करण राजेंद्र पुरी (23, रा. रेसकोर्स नाका संभाजीनगर) अशी संशयितांची नावे आहेत. मृताची पत्नी दैवशाला यांनी गांधीनगर पोलिसात फिर्याद दिली.
गणेश संकपाळ याला दारूचे व्यसन होते. बुधवारी तो डॉक्टरकडे जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला. त्याने विकी जगदाळे याच्या पान टपरीतून सिगरेटचे पाकीट उधार घेतले. उधारी देण्यासाठी तो आला नाही म्हणून त्याच्या वसुलीसाठी विकी साथीदारांच्या मदतीने उधारी वसूल करण्यासाठी त्याच्याकडे गेला. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर धारदार शस्त्राने व सिमेंटच्या पाईपने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगरचे स.पो.नि. सत्यराज घुले तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तीन तासांत पाच संशयितांना ताब्यात घेतले.