

करंजफेण : राजापूर-कोल्हापूर राज्यमार्गावरील अणुस्कुरा (ता. शाहूवाडी) येथील धोकादायक वळणावर ट्रक आणि बुलेट मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत बुलेटस्वार नीलेश विलास पाटील (वय 25) ठार झाला, तर जोतिराम नामदेव रावण आणि संदीप दादासो पाटील (तिघेही रा. वाघुर्डे, ता. पन्हाळा) गंभीर जखमी आहेत. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले आहे.
राजापूरहून चिरा भरून प्रवीण राजाराम पाटील (रा. माजनाळ, ता. पन्हाळा) यांच्या मालकीचा ट्रक (एमएच09 जे 4445) कोल्हापूरच्या दिशेने येत होता. कोल्हापूरहून पाचलकडे बुलेट (एमएच 09 ओजे 6008) तिघांना घेऊन जाताना अपघात झाला. नीलेशच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली असून, अधिक तपास पोलिस अधिकारी गोरक्षनाथ माळी करत आहेत. अपघातानंतर ट्रकचालक गाडी घटनास्थळीच सोडून पसार झाला आहे. कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.