कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या तापमानात गुरुवारी किंचित वाढ झाली. पारा 35.5 अंशांपर्यंत गेला. यामुळे दिवसभर उन्हाच्या झळा काही प्रमाणात जाणवत होत्या. दरम्यान, जिल्ह्यात उद्यापासून वातावरण पुन्हा ढगाळ होईल, रविवारनंतर (दि.2) पावसाचा 'यलो अलर्ट' असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज सकाळी हवेत आर्द्रतेचे प्रमाण 76 टक्के इतके होते. सायंकाळी साडे पाच वाजता ते 49 टक्के इतके कमी झाले होते. दिवसभर हवेत वार्याचे प्रमाणही अधिक असल्याने उन्हाची तीव्रता दुपारचा कालावधी वगळता फारशी जाणवली नाही.
जिल्ह्यात उद्यापासून अनेक भागांत वातावरण ढगाळ राहील. काही भागांत विजेचा कडकडाटही होईल. काही भागांत तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. रविवारनंतर मात्र अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.